Shreyas Iyer Controversy in Ranji Trophy 2025 : मुंबई आणि जम्मू-काश्मीर यांच्यात सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जोरदार नाट्य पाहायला मिळाले. सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरच्या झेलवरून वाद झाला. श्रेयस अय्यर १७ धावा केल्यानंतर गोलंदाज आकिब नबीच्या षटकात झेलबाद झाला. यानंतर गोलंदाजाने जोरदार अपील केले आणि अंपायरने आऊट घोषित केले. यानंतर श्रेयस अय्यरने पॅव्हेलियनमध्ये परतण्याऐवजी त्याने मैदानावरच अंपायरशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर नॉन स्ट्राईकवर असलेला कर्णधार अजिंक्य रहाणेनेही नाराजी व्यक्त केली. पण निर्णय बदलला नाही आणि अय्यर परतावे लागले.
श्रेयस अय्यर आणि अंपायरमध्ये जुंपली –
जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज आकिब नबीचा चेंडू श्रेयस अय्यरच्या बॅटची धार घेऊन विकेटकीपर कन्हैया वाधवनकडे गेला. त्याने डुबकी मारून तो पकडला. पण हा झेल योग्य पद्धतीने घेतला गेला नाही, असे अय्यरचे मत होते. त्यामुळे पंचांनी आऊट दिल्यानंतरही तो नाराजी व्यक्त करत होता. त्यानंतर रहाणेला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्याने आपली नाराजी देखील व्यक्त केली आणि मैदानावरील अंपायर एस रवी यांच्याशी या झेलबद्दल चर्चा केली. मात्र प्रदीर्घ चर्चा होऊनही अंपायर त्यांचे म्हणणे मान्य करण्यास तयार नव्हते. ज्यामुळे त्यांनी आपला निर्णय कायम ठेवला. यानंतर अय्यर रागाने ड्रेसिंग रूमकडे गेला.
यापूर्वीही झाला होता वाद –
याआधीही जम्मू-काश्मीर आणि मुंबई यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात कॅटवरुन नाट्य रंगले होते. त्यावेळीही फलंदाज अय्यर आणि अंपायर एस रवी होते. खरे तर दुसऱ्या डावात अय्यर ८ धावा करून फलंदाजी करत असताना यष्टीरक्षकाने झेलबादची अपील केले होते. गोलंदाजांसह जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंना चेंडूला बॅटचा स्पर्श झाल्याचा आत्मविश्वास होता. मात्र जोरदार अपील करूनही पंचांनी आऊट दिले नाही. यानंतर खेळाडू चांगलेच संतापलेले दिसले होते.
शार्दुल ठाकूरच्या शतकाने मुंबईला तारलं –
मुंबईने दुसऱ्या डावात ९१ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर १०१ धावांवर संघाने सातवी विकेट्स गमावली. यानंतर शार्दुल आणि तनुष कोटियन यांनी संघाचा डाव सावरला. शार्दुलने शतक झळकावले. वृत्त लिहेपर्यंत त्याने ११९ चेंडूत ११३ धावा केल्या होत्या. शार्दुलच्या खेळीत १७ चौकारांचाही समावेश होता. शार्दुलच्या शतकाबरोबरच तनुष कोटियननेही शानदार कामगिरी केली. त्याने अर्धशतक झळकावले आहे. तनुषने ११९ चेंडूंचा सामना करत ५८ धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीत ६ चौकारांचा समावेश होता. शार्दुल आणि तनुषच्या खेळीच्या जोरावर मुंबईने ६७ षटकानंतर ७ गडी गमावून २७४ धावा करत १८८ धावांची आघाडी घेतली होती.
मुंबईच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांचा फ्लॉप शो कायम –
सामन्याच्या दुसऱ्या डावातही मुंबई संघातील स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो होता. दुसऱ्या डावात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा केवळ २८ धावा करून बाद झाला. यशस्वी जैस्वालने २६, अजिंक्य रहाणेने १६ आणि शिवम दुबे ० धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. पहिल्या डावात रोहितने ३ धावा, यशस्वीने ४ धावा, रहाणेने १२ धावा, अय्यरने ११ धावा केल्या तर शिवम दुबे खाते न उघडता बाद झाला.