Shreyas Iyer breaks Virender Sehwag’s 16-year-old record with fastest century: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध शानदार फलंदाजी केली. भारताने ५० षटकांत ४ गडी गमावून ३९७ धावा केल्या. रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांचा भारताला या धावसंख्येपर्यंत नेण्यात मोठे योगदान होते. या सामन्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी खेळली. श्रेयस अय्यरने या सामन्यात शतक झळकावत वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला.
या सामन्यात शुबमन गिल दुखापत झाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर मैदानात आला आणि त्याने जबरदस्त शैलीत फलंदाजी केली. त्याने अवघ्या ६७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात त्याने ७० चेंडूत ८ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने १०५ धावांची उत्कृष्ट खेळी करत वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडीत काढला. या सामन्यात श्रेयसने अवघ्या ३५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि विराट कोहलीसोबत शतकी भागीदारीही केली.
श्रेयस अय्यरने सेहवागचा १६ वर्ष जुना विक्रम मोडला –
श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध ६७ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. तो एकदिवसीय विश्वचषकाच्या बाद फेरीत सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला. त्याच वेळी, श्रेयस अय्यर एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वात वेगवान शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आला आहे. त्याने वीरेंद्र सेहवागला मागे टाकले, ज्याने १६ वर्षांपूर्वी ८१ चेंडूत हा पराक्रम केला होता.
वीरेंद्र सेहवागने २००७ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये बर्म्युडाविरुद्ध ८१ चेंडूत शतक झळकावले होते, मात्र श्रेयसने हा पराक्रम ६७ चेंडूत करत त्याला चौथ्या स्थानावर ढकलले. भारतासाठी विश्वचषकातील सर्वात जलद शतक केएल राहुलने त्याच मोसमात नेदरलँड्सविरुद्ध ६१ चेंडूत झळकावले होते, तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्मानेही याच मोसमात दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध ६३ चेंडूंत हा पराक्रम केला होता.
विश्वचषकात भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज (चेंडूंच्या बाबतीत)
६२ – केएल राहुल विरुद्ध नेदरलँड्स, बेंगळुरू, २०२३
६३ – रोहित शर्मा विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली, २०२३
६७ – श्रेयस अय्यर वि. न्यूझीलंड, मुंबई, २०२३
८१ – वीरेंद्र सेहवाग विरुद्ध बर्म्युडा, पोर्ट ऑफ स्पेन, २००७
८३ – विराट कोहली विरुद्ध बांगलादेश, मीरपूर, २०११