इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज येणार यावरुन बराच उहापोह झाला. मात्र भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला याचं ठोस उत्तर न मिळाल्यामुळे भारतीय संघाला विश्वचषक स्पर्धेत याचा फटका बसला. या स्पर्धेनंतर निवड समितीने पुन्हा एकदा संघ बांधणी करायचं ठरवलं आहे. निवड समिती प्रमुथ एम.एस.के. प्रसाद यांच्या मते श्रेयस अय्यर हा भारतीय संघात चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी चांगला पर्याय ठरु शकतो.

“जर तुम्हाला आठवत असेल तर आम्ही श्रेयसला साधारण १८ महिन्यांपूर्वी भारतीय संघात स्थान दिलं होतं. आतापर्यंत मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये काही अपवाद वगळता श्रेयसने चांगली कामगिरी केली आहे. मात्र दुर्दैवाने आम्ही त्याला अधिक संधी देऊ शकलो नाही. मात्र या कालावधीत त्याच्याच एक खेळाडू म्हणुनही सुधारणा झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात वन-डे आणि टी-२० संघात तो चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी चांगला पर्याय ठरु शकतो”, प्रसाद पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.

नुकतच श्रेयसने सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मुंबईकडून खेळताना आक्रमक फलंदाजी केली होती. ६ डिसेंबरपासून भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिका खेळण्यास सुरुवात करेल. मध्यंतरी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघ व्यवस्थापनानेही श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर दीर्घकाळासाठी त्याचा वापर केला जाईल असे संकेत दिले होते. त्यामुळे विंडीजविरुद्ध मालिकेत भारतीय संघ आणि श्रेयस अय्यरच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – टी-२० क्रिकेटमध्ये कृणालपेक्षा रविंद्र जाडेजा चांगला पर्याय !

Story img Loader