मुंबई : गेल्या काही काळापासून मोठ्या खेळीच्या शोधात असलेल्या श्रेयस अय्यरला (१९० चेंडूंत १४२ धावा) अखेर शतक साकारण्यात यश आले. त्याच्या शानदार खेळीमुळे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील महाराष्ट्राविरुद्धच्या लढतीत मुंबईने पहिल्या डावात त्रिशतकी आघाडी मिळवली. त्यानंतर दुसऱ्या डावात महाराष्ट्राने कडवा प्रतिकार करताना दुसऱ्या दिवसअखेर १ बाद १४२ धावांची मजल मारली. मात्र, महाराष्ट्राचा संघ अजूनही १७३ धावांनी पिछाडीवर असल्याने मुंबईचा दबदबा कायम राहिला आहे.

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथील शरद पवार क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याचा दुसरा दिवस मुंबईसाठी श्रेयस आणि आयुष म्हात्रे, तर महाराष्ट्रासाठी हितेश वाळुंज आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी गाजवला. श्रेयसने प्रथमश्रेणी कारकीर्दीतील १४वे शतक साकारताना १२ चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने १४२ धावांची खेळी केली. १७ वर्षीय सलामीवीर आयुष म्हात्रेनेही (२३२ चेंडूंत १७६) अप्रतिम फलंदाजी केली. त्यामुळे मुंबईने पहिल्या डावात ४४१ धावा केल्या.

हेही वाचा >>> IND vs NZ : भारत पाचव्या दिवशी न्यूझीलंडविरुद्ध २० वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? जाणून घ्या इतिहास

मग ३१५ धावांच्या पिछाडीनंतर महाराष्ट्राने दुसऱ्या डावाच्या पहिल्याच षटकात सिद्धेश वीरला (०) गमावले. परंतु, ऋतुराजने (७२ चेंडूंत नाबाद ८०) आक्रमक पवित्रा अवलंबताना मुंबईच्या गोलंदाजांवर दडपण आणले. त्याला सचिन धसची (११२ चेंडूंत नाबाद ५९) साथ लाभली. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुनरागमनाच्या आशा कायम राहिल्या आहेत.

त्याआधी, दुसऱ्या दिवशी ३ बाद २२० धावांवरून पुढे खेळताना मुंबईसाठी श्रेयस आणि आयुष यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली. त्यांनी तिसऱ्या गड्यासाठी २०० धावांची भागीदारी रचली. आयुष द्विशतकी मजल मारणार असे वाटत असतानाच डावखुरा फिरकीपटू हितेश वाळुंजने त्याला माघारी धाडले. आयुषने १७६ धावांची खेळी २२ चौकार आणि ४ षटकारांनी सजवली. यानंतर मात्र वाळुंजच्या प्रभावी माऱ्यापुढे मुंबईने ठरावीक अंतराने गडी गमावले. सूर्यकुमार यादव (७) अपयशी ठरला.