Shreyas Iyer IND vs NZ: टीम इंडियाने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध 70 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अंतिम फेरीत दाखल होण्याच्या शर्यतीत भारताने जोरदार फलंदाजी केली. ३९८ धावांचे आव्हान देऊन किवींना भारतीय गोलंदाजांनी ४८.५ षटकात गुंडाळले. अगदी अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याचे विक्रमी ५० वे एकदिवसीय शतक केले तर मोहम्मद शमीने विश्वचषकात ५० विकेट्सचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. दुसरीकडे भारताचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज श्रेयस अय्यरने सुद्धा अवघ्या ६७ चेंडूंमध्ये शतकपूर्ती करत संघाच्या धावसंख्येत मोठे योगदान दिले. मध्यंतरी प्रचंड टीकेचा सामना करावा लागल्याने श्रेयस अय्यरसाठी मिळालेली संधी ही अत्यंत खास होती व तिचे त्याने सोने केले.
शॉर्ट-पिच चेंडूंविरुद्ध अय्यरचा संघर्ष, अनेक चाहत्यांसाठी आणि माजी क्रिकेटपटूंसाठी चिंतेचा विषय होता. यावरून अनेकांनी अय्यरला सुनावले सुद्धा होते. स्पर्धेच्या प्रारंभ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या श्रेयस अय्यरची सुरुवातच शून्याने झाली. नंतर दोन सामने २५ व ५३ धावांच्या नाबाद स्कोअरनंतर पुन्हा बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्धच्या पुढील तीन सामन्यांमध्ये त्याला फक्त १९, ३३ आणि ४ धावा करता आल्या होत्या.
मात्र या निराशाजनक खेळीनंतर अय्यरवर करो वा मरोची वेळ आली होती, अशात त्याने स्वतःचा खेळ असा काही पालटून टाकला की त्यानंतरच्या चारही सामन्यांमध्ये त्याने अर्धशतकाहून अधिक धावा केल्या. श्रीलंकेविरुद्ध त्याची ८२ तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७७ धावांची खेळी अविस्मरणीय ठरली तर नेदरलँड्स आणि न्यूझीलंडसह खेळांमध्ये त्याने सलग दोन शतके झळकावली. उपांत्य फेरीतील त्याच्या खेळीनंतर, अय्यरने स्टार स्पोर्ट्सच्या प्रसारकांशी बोलताना हे कबूल केले की त्याला सुरुवातीला टीका करणाऱ्या सर्वांमुळे खूप राग आला होता.
श्रेयस म्हणाला की, “विश्वचषकाच्या सुरुवातीला 1-2 सामन्यांमध्ये मी चांगली कामगिरी केली नाही. मी सुरुवात करत होतो, परंतु मोठी धावसंख्या साध्य करता येत नव्हती. पण जर तुम्ही (आकडेवारी) बघितली तर, मी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानविरुद्ध नाबाद होतो. त्यानंतर दोन सामने माझ्यासाठी वाईट ठरले मग लोक म्हणू लागले की याला काहीतरी प्रॉब्लम आहे. आतून मला खूप राग आला होता, मी ते दाखवत नव्हतो पण मला माहित होते की माझी वेळ येईल आणि मग मी स्वतःला सिद्ध करेन. आणि आता योग्य वेळी आली आहे.”
हे ही वाचा<< IND vs NZ: शतक श्रेयस अय्यरचं पण व्हायरल झाला रोहित शर्मा! Video बघून लोकं म्हणतात, “तू कधीही कोणालाही..”
दरम्यान, यापूर्वी सुद्धा श्रेयस अय्यरने एका सामन्याच्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शॉर्ट बॉलवर प्रश्न करणाऱ्या पत्रकाराला सुनावले होते. “मी चौकार षटकार मारले ते तुम्ही पाहिले नाही का. सगळ्यांनाच खेळताना थोडं पुढे येऊन खेळावं लागतं त्यात एखादा-दुसरा बॉल मिस झाला की लगेच सगळे टीका करायला तयार असतात. पण मला विचाराल तर मला काहीच त्रास नाहीये.” असे अय्यर म्हणाला होता.