Shreyas Iyer Reaction Fake News About Him Miss Next Ranji Trophy Match: सध्या रणजी ट्रॉफीचे सामने खेळवले जात आहेत. यामध्ये मुंबई संघाने महाराष्ट्राचा पराभव करत पहिला रणजी सामना जिंकला, ज्यात श्रेयस अय्यरने शतक झळकावले होते. पण आता श्रेयस अय्यर दुखापतीमुळे पुढील सामन्याला मुकणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. पण यादरम्यान श्रेयस अय्यरने खोटी बातमी पसरवणाऱ्यांना फटकारत एक पोस्ट एक्सवर शेअर केली आहे.
श्रेयस अय्यर गेल्या काही काळापासून भारतीय संघातून बाहेर आहे. यादरम्यान तो सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. या मोसमात मुंबईसाठी तीनही देशांतर्गत सामने श्रेयस अय्यरला खेळला आहे. यात इराणी चषकाचाही समावेश आहे, ज्याचे विजेतेपद मुंबई संघाने २७ वर्षांनंतर जिंकले. अय्यरने रेस्ट ऑफ इंडिया संघाविरुद्धच्या सामन्यात ५७ आणि ८ धावा केल्या. दुखापतीमुळे श्रेयस रणजी सामन्यातील त्रिपुराविरुद्धचा सामना खेळणार नसल्याचे काही वृत्तात म्हटले आहे. पण दुखापतीबाबत केलेल्या ट्विटवर श्रेयस संतापला आणि म्हणाला, “खोटी माहिती पसरवण्यापूर्वी आधी याचा नीट अभ्यास करा.” त्यानंतर युजरने श्रेयसच्या दुखापतीबाबत त्याचं ट्विट डिलीट केलं आहे.
हेही वाचा – VIDEO: नवा विश्वविक्रम! न्यूझीलंडच्या खेळाडूने फक्त इतक्या चेंडूत झळकावले सर्वात जलद द्विशतक
श्रेयस अय्यर वैयक्तिक कारणांमुळे २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान आगरतळा येथील महाराजा बीर बिक्रम कॉलेज स्टेडियमवर त्रिपुरा विरुद्ध मुंबईच्या रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीच्या सामन्याला मुकणार आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाने मुंबईच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीला थोडी विश्रांती देण्याची विनंती केली होती आणि त्याचे अपील मान्य करण्यात आले आहे, असे म्हटले जात आहे.
श्रेयस अय्यरने गेल्या आठवड्यात महाराष्ट्राविरुद्धच्या रणजी ट्रॉफी अ गटाच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात १४२ धावांची शानदार खेळी केली आणि मुंबईला पहिला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. यानंतर फलंदाजाने दावा केला होता की तो त्याच्या फिटनेसच्या बाबतीत सतत प्रगती करत आहे. शतकानंतर अय्यर म्हणाला, “खूप दिवसांनी पुनरागमन करणं खूपच खास आहे. साहजिकच, माझ्या दुखापतीमुळे मी थोडी निराश झालो होतो, पण एकंदरीत खूप दिवसांनी शतक झळकावताना खूप छान वाटतंय.”
श्रेयस अय्यर म्हणाला होता, “मी पुनरागमन करण्यास पूर्णपणे उत्सुक आहे, परंतु म्हटल्याप्रमाणे, गोष्टी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणही गरजेचं आहे आणि माझं काम सातत्याने चांगली कामगिरी करत राहणं, शक्य तितकं खेळणं आणि माझा फिटमेस कायम राहील, असा माझा प्रयत्न आहे. हो मग (अजूनही कसोटी क्रिकेट खेळायचं आहे). म्हणूनच मी खेळत आहे. नाहीतर मी काहीतरी कारण सांगून बाहेर बसलो असतो.”