IND vs NZ Shreyas Iyer Fifty: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट टप्प्यातील अखेरचा सामना आज २ मार्च रोजी दुबईत खेळवला जात आहे. भारतीय संघाची चॅम्पियन्स ट्रॉफीच्या गट टप्प्याचील खरी परिक्षा असलेला सामना न्यूझीलंडविरूद्ध खेळवला जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात श्रेयस अय्यर टीम इंडियासाठी सर्वात मोठा खेळाडू म्हणून उदयास आला. टीम इंडियाने एकेकाळी अवघ्या ३० धावांत ३ मोठे विकेट गमावले होते. त्यावेळी अय्यरने एक टोक सांभाळत टीम इंडियाला अडचणीतून बाहेर काढले.
श्रेयस अय्यरने सुरूवातीला ४ चौकारांसह ७५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. श्रेयसचे अर्धशतक पूर्ण होताच श्रेयसने बॅट दाखवत आपलं अर्धशतक साजरं केलं. अक्षरबरोबर श्रेयसने ९८ धावांची चांगली भागीदारी रचत भारताचा डाव सावरला. पण श्रेयसच्या या अर्धशतकी खेळी केलेल्या बॅटचं खास कनेक्शन हिटमॅनशी म्हणजेच रोहित शर्माशी आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने शुबमन गिल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या विकेट्स अवघ्या ३० धावांत गमावल्या होत्या. अशा वेळी चौथ्या क्रमांकाचा फलंदाज श्रेयस अय्यरने जबाबदारी स्वीकारत अक्षर पटेलसह ९८ धावांची भागीदारी केली.
या डावात श्रेयस अय्यरने ९८ चेंडू खेळले आणि ७९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. ज्यामध्ये ४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. अय्यरच्या फलंदाजीदरम्यान बॅटवर हिटमॅन असे लिहिलेले दिसले. भारतीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर हिटमॅन टॅग आहे. रोहित आणि अय्यर दोघेही त्यांच्या बॅटवर CEAT कंपनीचा टॅग लावतात, त्यामुळे या खास खेळीशी रोहितचा संबंध स्पष्ट होतो. तर समालोचन करतानाही श्रेयस रोहितच्या बॅटने खेळत असल्याचा खुलासा करण्यात आला.
श्रेयस अय्यरने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. तेव्हापासून तो एकूण ६ एकदिवसीय सामने खेळला आहे, ज्यामध्ये अय्यरने एकूण ४ अर्धशतकं झळकावली आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यातही अय्यरने ५६ धावांची खेळी केली होती.
त्यामुळे श्रेयस अय्यर मधल्या फळीतील भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. श्रेयस अय्यरची बॅट न्यूझीलंडविरुद्ध नेहमीच तळपताना दिसली आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध १०५ धावांची शानदार खेळीही खेळली होती. अय्यरने कायमच न्यूझीलंडविरूद्ध मोठी खेळी केली आहे.