इंग्लंडविरुद्ध काल(दि.२३) पुण्यामध्ये झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने पाहुण्या संघाचा ६६ धावांनी धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पण, या सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या मधल्या फळीतील महत्त्वाचा फलंदाज जायबंदी झाला.

टीम इंडियाचा फलंदाज आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर पहिल्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना जायबंदी झाला. इंग्लंडच्या संघाची फलंदाजी सुरू असताना आठव्या षटकात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोने मारलेला शॉट अडवताना श्रेयस अय्यरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. त्यानंतर श्रेयसला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून तो उर्वरित सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली. नंतर श्रेयसच्या जागी शुबमन गिल मैदानावर आला. आता शुक्रवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. या सामन्याआधी श्रेयस अय्यर फिट न झाल्यास भारतीय संघव्यवस्थापनाकडून सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातही पदार्पणाची संधी मिळू शकते. खांद्यांच्या हाडाला झालेली दुखापत ठिक होण्यास जवळपास सहा आठवड्यांचा वेळ लागतो. शिवाय सर्जरी झाली तर त्यापेक्षाही जास्त कालावधी लागतो. सध्या श्रेयसच्या प्रकृतीविषयी माहिती मिळालेली नाही, पण त्याची दुखापत गंभीर असल्यास शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासह तो यंदाच्या आयपीएल स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता आहे. ९ एप्रिलपासून आयपीएल स्पर्धेला सुरूवात होणार आहे, श्रेयस जखमी असल्यास तो दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा धक्का ठरेल.

दुसरीकडे, पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यरसोबतच भारताचा सलामीवीर रोहित शर्माही जायबंदी झाला. डावाच्या पाचव्या षटकात उजव्या हाताच्या कोपरावर मार्क वूडचा चेंडू लागल्याने तो जखमी झाला. तरीही त्याने मैदान सोडलं नाही, आणि संघासाठी २८ धावांचं योगदान दिलं. रोहितच्या जागी सूर्यकुमार यादव क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला होता. आता उर्वरित 2 सामन्यांपर्यंत जर दोन्ही खेळाडूंची प्रकृती सुधारली नाही तर दोघंही एकदिवसीय मालिकेतून बाहेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असं झाल्यास हा भारतीय संघासाठीही मोठा धक्का ठरू शकतो.

Story img Loader