Shreyas Iyer Captain of Mumbai Team: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, केकेआरने २०२४ साली आयपीएलचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळवले होते आणि या लीगमधील संघाचे हे तिसरे विजेतेपद होते. यानंतर आयपीएल २०२५ च्या लिलावापूर्वी संघाने श्रेयस अय्यरला रिलीज केले आहे. यानंतर आता श्रेयस २ कोटींच्या मूळ किमतीसह लिलावात दिसणार आहे. पण तत्त्पूर्वी त्याच्यावर एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. श्रेयस अय्यरला २३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत स्पर्धेचे नेतृत्त्व करण्याची जबाबदारी मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) च्या वरिष्ठ निवड समितीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबई टी-२० संघाच्या कर्णधारापदी श्रेयस अय्यरची नियुक्ती केली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४-२५ साठी संघ निवडण्यासाठी MCA वरिष्ठ निवड समितीची रविवारी बैठक झाली. २३ तारखेपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी या निवड समितीने श्रेयस अय्यरची मुंबईचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली.

हेही वाचा – संजू सॅमसनच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मनं, षटकारामुळे घायाळ झालेल्या चाहतीची घेतली भेट अन्…, पाहा VIDEO

निवड समितीच्या म्हणण्यानुसार या स्पर्धेत कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर हा सर्वोत्तम पर्याय आहे. श्रेयसला कर्णधार बनवल्यानंतर सध्याच्या रणजी मोसमात मुंबईचे कर्णधार असलेला अजिंक्य रहाणे आता त्याच्या नेतृत्त्वाखाली खेळताना दिसणार आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एमसीएच्या निवड समितीने रहाणेला कळवले होते की ते श्रेयस अय्यरकडे छोट्या फॉरमॅटमध्ये मुंबई संघाचा कर्णधार म्हणून पाहत आहेत.

मुंबईच्या संघात या स्पर्धेसाठी पृथ्वी शॉचाही समावेश करण्यात आला आहे, ज्याला रणजी ट्रॉफी सामन्यांमधून वगळण्यात आले होते आणि त्याला फिटनेस सुधारण्यास सांगण्यात आले होते. पृथ्वीने फिटनेस सुधारला असून तो पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये संघासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो, असा विश्वास एमसीएने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – ENG vs WI: वेस्ट इंडिजचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय! संथ सुरूवातीनंतर षटकारांचा पाऊस, कॅरेबियन संघाने मोडला ७ वर्षे जुना विक्रम

एका सूत्राने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की श्रेयस अय्यर सय्यद मुश्ताक अलीसाठी मुंबई टी-२० संघाचे नेतृत्व करेल आणि पृथ्वी शॉचा देखील संघात समावेश करण्यात आला आहे. रहाणे आता अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, कारण एमसीएला वाटते की रहाणेनंतर आता अय्यर या फॉरमॅटसाठी कर्णधार म्हणून योग्य पर्याय आहे.

शिवम दुबे, मुशीर खान आणि तुषार देशपांडे हे अष्टपैलू खेळाडू अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेले नाहीत आणि त्यामुळेच त्यांना या स्पर्धेसाठी मुंबई संघात स्थान देण्यात आलेले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas iyer to captain mumbai team in syed mushtaq ali trophy prithvi shaw included in squad ajinkya rahane bdg