ICC Awards Shreyas Iyer: भारताता सध्या आयपीएल २०२५ ची क्रेझ आहे. जगभरातील खेळाडू आयपीएल खेळण्यासाठी सध्या भारतात आहेत. आयपीएल सुरू होण्यापूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय संंघाने या चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद पटकावलं होतं. भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात श्रेयस अय्यरने मोठी भूमिका बजावली होती. त्याच्या या योगदानाची दखल आयसीसीने घेतली आहे आणि त्याला मोठा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

श्रेयस अय्यर भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने मार्च २०२५ चा आयसीसी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे, त्याने न्यूझीलंडच्या जेकब डफी आणि रचिन रवींद्र यांना मागे टाकलं आहे. भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे.

फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून भारताच्या शुबमन गिलची निवड झाली होती. तर, श्रेयस अय्यरने दुसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकला आहे. याआधी भारताकडून फक्त शुबमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांनीच दोन किंवा त्याहून अधिक वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

श्रेयसने २४३ धावा करून भारताच्या फलंदाजी क्रमवारीत आघाडी घेतली आणि मधल्या फळीत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. २०१३ नंतर पहिल्यांदाच भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. १२ वर्षांनंतर भारताने जिंकलेल्या आयसीसीच्या या वनडे स्पर्धेत त्याने महत्त्वाचे योगदान दिले. गेल्या वर्षी बीसीसीआयच्या केंद्रीय करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून वगळण्यात आलेल्या श्रेयसने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार पुनरागमन केले. तीन सामन्यांमध्ये दोन अर्धशतकं झळकावल्यानंतर त्याची चॅम्पियन्स ट्रॉफी संघात निवड झाली.

स्पर्धेतील अ गटातील सामन्यात, अय्यरने ९८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ७९ धावांची केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताला न्यूझीलंडसमोर २५० धावांचा टप्पा गाठता आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या यशस्वी उपांत्य फेरीच्या पाठलागात त्याने ६२ चेंडूत ४५ धावांचे योगदान दिले आणि त्यानंतर अंतिम सामन्यात, पुन्हा एकदा न्यूझीलंडविरुद्ध, ६२ चेंडूत ४८ धावांची खेळी करत संघाच्या धावसंख्येत महत्त्वपूर्ण भर घातली.