Asia Cup 2023, Shreyas Iyer: श्रेयस अय्यरला पाठीच्या समस्येतून सावरता आलेले नाही आणि त्यामुळेच मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध आशिया चषक २०२३च्या सुपर-४ सामन्यातून तो बाहेर पडला. तत्पूर्वी, हा स्टार फलंदाज पाठीच्या दुखण्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषक २०२३च्या सुपर-४ सामन्यात शेवटच्या क्षणी प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडला होता आणि त्याच्या जागी के.एल. राहुलचा समावेश करण्यात आला. आजच्या सामन्यात देखील तो संघासोबत मैदानात आला नाही, त्यामुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रेयस अय्यरच्या दुखापतीबाबत माहिती दिली. “या सामन्यासाठी तो उपलब्ध नसल्याचं”, त्यांनी सांगितलं. बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “श्रेयस अय्यरला बरे वाटत आहे, परंतु तो अजूनही त्याच्या पाठीच्या दुखण्यापासून पूर्णपणे बरा झालेला नाही. आशिया कप मध्ये तो पूर्णपणे फिट नव्हता अजूनही त्यामुळे तो हॉटेल मध्येच थांबला आहे.” त्याला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने विश्रांतीचा सल्ला दिला असून श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या सुपर-४ सामन्यासाठी तो संघासोबत स्टेडियममध्येही गेला नाही.
पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर पाकिस्तानविरुद्ध खेळला नव्हता
वृत्तानुसार, सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच NCAचे कर्मचारी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) व्यवस्थापक आणि कोलंबोस्थित संघ व्यवस्थापन त्याच्यावर नजर ठेवून आहेत. याआधी रविवारी श्रेयस अय्यरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव करताना पाठीत दुखापत झाली होती. नाणेफेक दरम्यान कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला होता की सराव दरम्यान श्रेयसला दुखापत झाली होती आणि त्याच्या जागी के.एल. राहुलचा समावेश करण्यात आला होता.
रोहितने नंतर खुलासा केला की के.एल. राहुलची निवड करण्याचा निर्णय सामन्याच्या केवळ ५ मिनिटे आधी घेण्यात आला होता. पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये श्रेयस अय्यरच्या जागी आलेल्या के.एल. राहुलने शानदार नाबाद शतक झळकावले. रोहितने सामन्यानंतर राहुलच्या कामगिरीचे कौतुक केले आणि म्हणाला, “ दुखापतीतून परतलेल्या के.एल.ला नाणेफेकच्या ५ मिनिटे आधी माहित होते की तो खेळत आहे आणि त्याने ज्या पद्धतीने कामगिरी केली, त्यातून या खेळाडूंची मानसिकता दर्शवते.”
विश्वचषकापूर्वी श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली
श्रेयस अय्यर सध्या जरी तंदुरुस्त नसला तरी तो लवकरच तंदुरुस्त होऊन आशिया कपचे उर्वरित सामने खेळण्याची शक्यता आहे. श्रेयसची भारताच्या विश्वचषक संघातही निवड झाली आहे. सध्या तरी श्रेयसला आशिया कपमधून मायदेशी पाठवण्याची कोणतीही योजना नाही. अय्यरची दुखापत हा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासाठीही चिंतेचा विषय आहे, कारण त्यांनी त्याच्या पुनरागमनानंतर चौथ्या क्रमांकासाठी त्याचे नाव निश्चित केले होते. अय्यरने मार्चपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही आणि पाठीच्या दुखापतीमुळे तो संपूर्ण आयपीएलमधून बाहेर होता.
श्रेयसची दुखापत केवळ विश्रांती आणि रिहॅबिलिटेशनने बरी होणार नाही हे लक्षात आल्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. एनसीए वैद्यकीय कर्मचार्यांनी तंदुरुस्त घोषित केल्यानंतर अय्यरची आशिया चषक आणि विश्वचषक या दोन्ही संघांमध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामुळे टीम इंडिया व्यवस्थापनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. अय्यरच्या येण्याने चौथ्या क्रमांकाबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळेल असे वाटत होते मात्र, तसे झाले नाही.
विश्वचषकाला एक महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना अय्यरच्या ताज्या दुखापतीने संघ व्यवस्थापनाचा ताण वाढला आहे. प्रश्न असा आहे की, जिथे टीम इंडियाला ९ सामने खेळायचे आहेत, त्या विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर असलेल्या अय्यरसारख्या तंदुरुस्तीशी झगडणाऱ्या फलंदाजाला त्यांनी आजमावायचे का? टीम इंडियाने विश्वचषक स्पर्धेसाठी जरी तात्पुरता संघ जाहीर केला असला तरी २७ सप्टेंबरपर्यंत त्यांना त्यात बदल करण्याची संधी आहे. अशा स्थितीत भारतीय संघ तिलक वर्मा किंवा संजू सॅमसनसारख्या खेळाडूंचाही संघात समावेश करू शकतो.