India vs West Indies ODI Series: भारत आणि वेस्ट इंडिज संघांतील तीन सामन्यांची वनडे मालिका मंगळवारी पार पडली. मालिकेतील तिसरा सामना ब्रायन लारा स्टेडियम त्रिनिदाद येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर २०० धावांनी मोठा विजय मिळवत मालिकेवर नाव कोरले. दरम्यान या सामन्यात युवा खेळाडू इशान-शुबमने महत्त्वाचे योगदान दिले. यावर ब्रायन लारा यांनी भारतीय क्रिकेटमध्ये युवा प्रतिभेची कमतरता नसल्याचे म्हटले आहे. ब्रायन लारा गिल-किशनशी संवाद साधतानाचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला.
भारताचा वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघ यावेळी केवळ दोनच नव्हे तर ‘तिसरा संघ’ देखील मैदानात उतरू शकतो, असा विश्वास महान फलंदाज ब्रायन लारा यांनी व्यक्त केला. महान फलंदाजांपैकी एक असलेल्या ब्रायन लाराने शुबमन गिल आणि इशान किशन यांच्याशी संवाद साधताना ही माहिती दिली. शुबमन गिल आणि इशान किशन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने निर्णायक तिसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजचा पराभव केला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वेबसाईटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ब्रायन लारा भारतीय क्रिकेटपटूंशी बोलताना म्हणाला, “भारत माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखा आहे. मी भारतात नेहमीच युवा प्रतिभावान खेळाडूंना समोर येताना पाहिले आहे. भारतीय संघासह येथील प्रतिभावान खेळाडूंची संख्या आणि सध्या त्यांच्याकडे असलेल्या संघांची संख्या पाहता, ते दुसरी इलेव्हन निवडू शकतील असे दिसते. अगदी तिसरी इलेव्हनही.”
विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत भारताने तिसरा एकदिवसीय सामना जिंकला. लाराने इशानला वेस्ट इंडिजच्या युवा क्रिकेटपटूंना सल्ला देण्यास सांगितले. गेल्या काही काळात वेस्ट इंडिज संघाच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत आहे. किशन म्हणाला की, वेस्ट इंडिजच्या युवा खेळाडूंकडे लारासारखे दिग्गज असताना, त्यांना मदतीसाठी इतर कोणाकडे पाहण्याची गरज नाही.
खेळाची भूक ही सर्वात महत्त्वाची गोष्ट –
इशान किशन म्हणाला, “मला वाटते की या खेळाचा विचार करताना भूक ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला संघासाठी, स्वत:साठी, तुमच्या कुटुंबासाठी चांगले करायचे आहे, वेस्ट इंडिजमध्ये असे अनेक महान खेळाडू आहेत, ज्यांच्याशी ते नेहमी बोलू शकतात. तुमच्यासारख्या लोकांकडे येऊन ते तुमच्याशी बोलू शकतात. या सुंदर अकादमीमध्ये याबद्दल बोलू शकता. त्यांना तुमच्या अनुभवातून आणि प्रत्येक गोष्टीतून खूप काही शिकायला मिळेल. या छोट्या गोष्टी तरुणांना खूप उपयोगी पडतील.”
लाराच्या फलंदाजीतून शुबमन गिलला मिळते प्रेरणा –
शुबमन गिल म्हणाला की, लाराच्या प्रवाहमय फलंदाजीने त्याला खूप प्रेरणा दिली आहे. तो म्हणाला, “माझ्या सर्व आठवणी गोलंदाजांविरुद्ध फटके खेळण्याच्या आणि त्यांना लक्ष्य करण्याच्या आहेत. विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये.” ब्रायन लारा म्हणाले की या दोन तरुण खेळाडूंना स्टेडियममध्ये किंवा त्यांच्या नावावर असलेल्या अकादमीमध्ये पाहून खूप आनंद होतो.
हेही वाचा – IND vs WI: “वेगवेगळ्या गोलंदाजांसाठी माझ्या…”; तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर संजू सॅमसनची प्रतिक्रिया
लाराने इशान किशनला इन्स्टाग्रामवर केला होता मेसेज –
संभाषणादरम्यान, इशानने सांगितले की एकदा त्याला इन्स्टाग्रामवर लाराचा एक संदेश आला, ज्यामुळे त्याला धक्का बसला. कारण त्याला असा दिग्गज खेळाडूकडून अशी अपेक्षा नव्हती. इशान म्हणाला, “तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज केल्यावर मला खूप आनंद झाला होता. खरं तर तुम्ही मला मेसेज कसा केला याचा मला धक्काच बसला. दिग्गजाने मला संदेश पाठवल्याने आणि मला त्याचा खूप आनंद झाला होता.”