Shubman Gill seventh ODI Century in IND vs ENG 3rd ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यात भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले होते, पण कर्णधार रोहित शर्मा डावाची सुरुवात करताना स्वस्तात बाद झाला. यानंतर, युवा सलामीवीर शुबमन गिलने विराट कोहलीसह भारताचा डाव सावरला. यानंतर युवा फलंदाजाने शानदार शतक झळकावले. या शतकासह शुबमन गिलने इतिहास घडवला.
शुबमन गिलने घडवला इतिहास –
इंग्लंडविरुद्ध दोनदा शतक हुकल्यानंतर, गिलने तिसऱ्या सामन्यात शतक पूर्ण केले. तो १०२ चेंडूत ११२ धावा करून बाद झाला. गिलने आपल्या शतकी खेळीत १४ चौकार आणि ३ षटकार मारले. या शतकासह, गिलने अशी कामगिरी केली जी भारताच्या इतर कोणत्याही फलंदाजाला करता आली नाही. खरं तर, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात एकाच स्टेडियमध्ये शतक झळकावणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० आणि कसोटीत शतके झळकावल्यानंतर, गिलने आता एकदिवसीय सामन्यात शतक झळकावण्याचा महान पराक्रम केला आहे. गिलने फक्त १०३ सामन्यांमध्ये एकाच ठिकाणी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके केली आहेत. गिलचे वनडे क्रिकेट कारकीर्दीतील सातवे शतक झळकावले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात एकाच ठिकाणी शतके झळकावणारे फलंदाज –
- फाफ डू प्लेसिस (दक्षिण आफ्रिका) जोहान्सबर्ग
- डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) अॅडलेड
- बाबर आझम (पाकिस्तान) कराची
- क्विंटन डी कॉक (दक्षिण आफ्रिका) सेंच्युरियन
- शुबमन गिल (भारत) अहमदाबाद
टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा भारताचा सातवा फलंदाज ठरला आहे. या यादीत पहिल्या स्थानावर के. श्रीकांत आहेत, ज्यानी १९८२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ही खास कामगिरी केली होती. या यादीत त्यांच्यानंतर अनुक्रमे दिलीप वेंगसकर, मोहम्मद अझरुद्धीन, महेंद्रसिंग धोनी, श्रेयस अय्यर आणि इशान किशन या खेळाडूंचा समावेश आहे. त्याचबरोबर के. श्रीकांत यांच्यानंतर मायदेशात हा पराक्रम करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
भारतासाठी ३ एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेतील प्रत्येक सामन्यात ५० हून अधिक धावा करणारे खेळाडू :
- क्रिस श्रीकांत विरुद्ध श्रीलंका १९८२ (मायदेशात)
- दिलीप वेंगसरकर विरुद्ध श्रीलंका १९८५ (विदेशात)
- मोहम्मद अझरुद्दीन विरुद्ध श्रीलंका १९९३ (विदेशात)
- एमएस धोनी विरुद्ध ऑस्ट्रेलिया २०१९ (विदेशात)
- श्रेयस अय्यर विरुद्ध न्यूझीलंड २०२० (विदेशात)
- इशान किशन विरुद्ध वेस्ट इंडिज २०२३ (विदेशात)
- शुभमन गिल विरुद्ध इंग्लंड २०२५ (मायदेशात)