Shubman Gill World Record IND vs ENG 3rd ODI: भारतीय संघाचा वनडेमधील नवा उपकर्णधार शुबमन गिलने इंग्लंडविरूद्ध वनडे मालिकेत वादळी फलंदाजी केली आहे. तिन्ही सामन्यांमध्ये त्याने ५० अधिक धावांचा टप्पा गाठला आहे. तर तिसऱ्या वनडे सामन्यात गिलने जबरदस्त शतक झळकावले आहे. यादरम्यान शुबमन गिलने एक मोठा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
शुबमन गिलने अहमदाबादमधील तिसऱ्या वनडे सामन्यात १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ९७ चेंडूत १०४ धावा करत आपले शानदार वनडे शतक पूर्ण केले आहे. तर भारतीय संघाचा वनडेमधील उपकर्णधार ही जबाबदारी मिळाल्यानंतर गिलचं हे पहिलं शतक आहे.
शुबमन गिलने २०२४ मध्ये भारताकडून वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. तोच फॉर्म कायम ठेवत गिलने या वर्षात सुरूवात केली आहे. गिलने वनडेमध्ये ५० डावांमध्ये सर्वात जलद २५०० धावांचा टप्पा गाठला आहे. ही कामगिरी करणारा गिल जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज हाशिम अमलाचा विक्रम मोडला, ज्याने ५० एकदिवसीय डावात २४८६ धावा केल्या होत्या, तर गिलने त्याच्या ५० व्या एकदिवसीय डावात २५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
शुभमन गिलने केवळ एका डावात विश्वविक्रम मोडला आहे. त्याने ५० एकदिवसीय डावात २५०० धावा पूर्ण केल्या आहेत. हाशिम अमलाने ५१ डावांमध्ये २५०० वनडे धावा पूर्ण केल्या होत्या. इमाम उल हकने ५२, व्हिव्ह रिचर्ड्सने ५६ आणि जोनाथन ट्रॉटनेही ५६ डावांत २५०० धावा पूर्ण केल्या.
शुभमन गिलने वनडेमध्ये ताबडतोड फलंदाजी केली आहे. गिलने ५० एकदिवसीय डावांत ६० पेक्षा जास्त सरासरीने २५०० हून अधिक धावा केल्या आहेत. गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही ठोकले आहे, त्याची सर्वोत्तम धावसंख्या २०८ धावा आहे. या खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण ६ शतकं आणि १५ अर्धशतकं केली आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही १०० पेक्षा जास्त आहे.
वनडे इतिहासात सर्वात जलद २५०० धावा करणारे खेळाडू
५० डाव : शुभमन गिल
५१ डाव : हाशिम आमला
५२ डाव : इमाम उल हक
५६ डाव: व्हिव्हियन रिचर्ड्स
५६ डाव : जोनाथन ट्रॉट
कारकिर्दीतील पहिल्या ५० एकदिवसीय डावात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
२५०३* – शुभमन गिल
२३८६ – इमाम-उल-हक
२२६२ – फखर जमान
२२४७ – शाई होप
शुबमन गिलची हॅटट्रिक
शुबमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हॅटट्रिक पूर्ण केली. गिलने या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये पन्नास अधिक धावा केल्या आहेत. गिलने नागपूर वनडेत ८७ धावांची खेळी केली होती. कटकमध्ये त्याने ६० धावा केल्या आणि त्याने तिसऱ्या वनडे सामन्यात शतक झळकावले असून तो नाबाद आहे.