India Squad Announces for T20 Series Against Zimbabawe: भारतीय संघ सध्या टी-२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडिजमध्ये आहे. दरम्यान, बीसीसीआयने विश्वचषकानंतर लगेचच झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने या मालिकेसाठी पूर्णपणे तरुण खेळाडू असलेला संघ निवडला आहे. त्याचबरोबर संघाचे कर्णधारपदही एका युवा खेळाडूच्या म्हणजेच शुबमन गिलच्या हाती दिले आहे, ज्याने अद्याप भारतीय संघाचे नेतृत्व केले नाही. गिल टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. या संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारताच्या १५ सदस्यीय संघात ५ नवीन चेहऱ्यांना स्थान मिळाले आहे. यामध्ये चार खेळाडू असे आहेत ज्यांनी अद्याप भारतासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. यामध्ये पंजाबचा अभिषेक शर्मा, आंध्रचा नितीश रेड्डी, मुंबईचा तुषार देशपांडे आणि आसामचा रियान पराग यांच्या नावाचा समावेश आहे. ध्रुव जुरेलने भारतासाठी कसोटीमध्ये पदार्पण केले पण अद्याप भारतासाठी टी-२० सामना खेळलेला नाही. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांना विश्रांती दिल्यानंतर, टी-२० विश्वचषकासाठी राखीव असलेले वेगवान गोलंदाज खलील अहमद आणि आवेश खान यांना १५ सदस्यीय संघात स्थान मिळाले. तर टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात संधी मिळालेल्या रिंकू सिंगचाही या मालिकेत समावेश करण्यात आला आहे.

शुबमन गिलच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

झिम्बाब्वे मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आलेल्या शुबमन गिलसमोर मोठे आव्हान असणार आहे. गिलने IPL 2024 मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व केले होते. गिलच्या नेतृत्वाखाली आयपीएल २०२४ मध्ये गुजरातचा संघ लीग टप्प्यातून बाहेर पडला आणि १४ पैकी फक्त पाच सामने जिंकण्यात यशस्वी ठरला. अशा परिस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याची मोठी जबाबदारी शुबमन गिलच्या खांद्यावर असेल. या मालिकेत त्याला कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करावे लागेल. या मालिकेत गिलला मोठी संधी मिळणार आहे.

झिम्बाब्वे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ

शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद , मुकेश कुमार, तुषार देशपांडे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill captain team india squad announced for zimbabwe t20 series after t20 world cup 2024 bdg