हैदराबाद : शुभमन गिलने स्वत:हून तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची इच्छा व्यक्त केली आणि भारतीय संघ व्यवस्थापनाने ती पूर्ण केली. मात्र, गिलला कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. असे असले तरी भारतीय संघाने त्याच्यावरील विश्वास कायम राखला आहे. इतकी संधी चेतेश्वर पुजाराला मिळाली नव्हती. त्यामुळे गिलने आता इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत मोठी खेळी करणे आवश्यक आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने व्यक्त केले.
हेही वाचा >>> IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात निवड झालेला सौरभ कुमार कोण आहे? जाणून घ्या
२४ वर्षीय गिलने गेल्या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद येथे झालेल्या कसोटीच्या पहिल्या डावात १२८ धावांची खेळी केली होती. मात्र, त्यानंतरच्या ११ कसोटी डावांमध्ये त्याला एकदाही अर्धशतक साकारता आलेले नाही. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात त्याने २३ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही.
‘‘गिलला जितकी संधी मिळत आहे, तितकी १०० हून अधिक कसोटी सामन्यांचा अनुभव असलेल्या पुजाराला मिळाली नाही. मी पुजाराचे नावे घेतले कारण गिलपूर्वी तो तिसऱ्या क्रमांकावर खेळत होता. पुजारा गेल्या वर्षी जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आणि त्यानंतर गिलला त्याच्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. गिल आधी सलामीवीर म्हणून खेळत होता. परंतु त्याने स्वत:हून तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती पूर्णही झाली. गिलच्या प्रतिभेबाबत जराही शंका नाही. मात्र, त्याच्या खेळात सुधारणेला बराच वाव आहे. त्याने आता विशाखापट्टणम कसोटीत मोठी खेळी करणे आवश्यक आहे, अन्यथा तो खूप दडपणाखाली येईल,’’ असे कुंबळे म्हणाला. ‘‘गिलने अधिक सकारात्मकतेने खेळले पाहिजे. तसेच खेळपट्टीकडून फिरकीला मदत असल्यास फलंदाज म्हणून तुम्ही चेंडू अलगद हाताने खेळणे आवश्यक असते. यावर गिलने काम केले पाहिजे. त्याच्याकडे राहुल द्रविडसारखा मार्गदर्शक आहे. याचा त्याने फायदा करून घेतला पाहिजे,’’ असेही कुंबळेने नमूद केले.