Shubman Gill overtook Babar Azam to become the highest run-scorer in first 26 innings of ODI: भारत आणि वेस्ट इंडिज संघांत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी केनिंगस्टन येथे खेळला. ज्यामध्ये वेस्ट इंडिजने भारताचा ६ विकेट्सने पराभव केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ४०.५ षटकांत सर्वबाद १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघाने ३६.४ षटकांत ४ गडी गमावून १८२ धावा केल्या. त्यामुळे संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. दरम्यान या सामन्यात भारताचा युवा फलंदाज शुबमन गिलने एक खास कारनामा केला आहे.
टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुबमन गिलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धमाका केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात गिलने ३४ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकत एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केला आहे. शुभमन गिल आता पहिल्या २६ डावांनंतर वनडेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात गिलने ४० चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. या खेळीच्या जोरावर त्याने कारकिर्दीतील २६व्या वनडेमध्ये १३५२ धावा पूर्ण केल्या आहेत. २६ डावांनंतर गिल वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी आला आहे. या प्रकरणात त्याने पहिल्या २६ डावात १३२२ धावा करणाऱ्या बाबर आझमला मागे टाकले आहे. आता गिल त्याच्याही पुढे गेला आहे.
हेही वाचा – KPL 2023: ६,६,६,६,६,६,६…सेदिकुल्लाह अटलचा कहर! एकाच षटकात कुटल्या ४८ धावा, पाहा VIDEO
पहिल्या २६ एकदिवसीय डावांत सर्वाधिक धावा करणारे अव्वल ५ खेळाडू –
शुबमन गिल – १२५२ धावा
बाबर आझम – १३२२ धावा
जोनाथन ट्रॉट – १३०३ धावा
फखर जमान – १२७५ धावा
रॅशी व्हॅन डर डुसेन – १२६७ धावा
शुबमन गिलची एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द –
शुबमन गिल हा युवा खेळाडू आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. या सलामीवीराने २६ सामन्यांच्या २६ डावांमध्ये ६१.४५ च्या उत्कृष्ट सरासरीने १३५२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ शतके आणि ५ अर्धशतकेही झळकली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये गिलची सर्वोच्च धावसंख्या २०८ धावा आहे. विशेष म्हणजे तो ४ वेळा नाबाद राहिला आहे.