Shubman Gill’s reaction to century : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. ही स्पर्धा कोणत्या दिशेला झुकलेली दिसते हे अद्याप कळू शकलेले नाही. भारतीय संघाने पहिल्या डावात शानदार फलंदाजी केली आणि यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताची धावसंख्या ४०० च्या जवळ पोहोचली. यानंतर इंग्लंडचा संघ अवघ्या २५३ धावांवर ऑलआऊट झाला, तेव्हा सामना भारताच्या कुशीत आल्याचे दिसत होते. पण त्यानंतर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने शानदार पुनरागमन करत भारताला अवघ्या २५५ धावांत गुंडाळले. या डावात शुबमन गिलने तब्बल १२ डावानंतर शतक झळकावले आणि भारताचा डाव सावरला.

गिलने टीम इंडियाचा दुसरा डाव सावरला –

शुबमन गिलच्या शतकी खेळीमुळे संघाला चांगली धावसंख्या गाठता आली आणि विजयाची आशा कायम राहिली. गिल बराच काळ फॉर्मात नव्हता. गिलने गेल्या १२ डावांत एकही कसोटी अर्धशतक झळकावले नव्हते. अशा स्थितीत या खेळीदरम्यान गिलकडून अपेक्षा नगण्य होत्या, पण गिलने शानदार पुनरागमन करत शतक झळकावले. या खेळीनंतर बीसीसीआयने शुभमन गिलचा एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये गिलने १२ डावांनंतर तो कसा फॉर्ममध्ये आला आहे हे सांगितले.

‘बाबांनी दिला सल्ला’ –

शुबमन गिल म्हणाला की, “तीन-चार सामन्यांमध्ये बॅटमधून धावा आल्या नसताना, धावा काढणे खूप महत्त्वाचे असते. मी शतक झळकावले माझ्यासाठी आजचा दिवस मोठा आणि आनंदाचा आहे. जेव्हा माझ्या बॅटमधून धावा होत नव्हत्या, तेव्हा हा काळ माझ्यासाठी सोपा नव्हता. याबद्दल माझे वडील म्हणाले होते की, सध्या जे काही चालले आहे ते विसरून जा आणि जुन्या फॉर्ममध्ये खेळण्याचा प्रयत्न करत रहा. हे मी माझ्या फलंदाजीत लागू केले आणि शतक झळकावले. माझे वडील नेहमीच सामना पाहण्यासाठी येण्याचा प्रयत्न करतात. बाबांसमोर शतक झळकावल्याने छान वाटत आहे.”

हेही वाचा – IND vs ENG 2nd Test : टीम इंडियाला मोठा धक्का! शुबमन गिलने शतकानंतरही वाढवली भारताची चिंता

शुबमन गिलने १२ डावानंतर शतक झळकावल्यानंतर आक्रमक सेलिब्रेशन केले नाही. तो याबद्दल म्हणाला, “संघाने माझ्यावर सोपवलेले काम पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे मी शतकानंतर आक्रमकपणे सेलिब्रेशन केले नाही.” त्याचबरोबर अँडरसनच्या गोलंदाजीबद्दलही शुबमन गिलने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मी एकावेळी एका चेंडूवर लक्ष केंद्रित करत होतो. त्यावेळी क्रीजवर नक्कीच खूप काही घडत होते. सुरुवातीला दोन विकेट झटपट पडल्या आणि नंतर माझ्या आणि श्रेयसमध्ये चांगली भागीदारी झाली.”