Shubman Gill finger injured updates : २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे, ज्यामध्ये टीम इंडिया सध्या पर्थमध्ये तीन दिवसीय इंट्रा स्क्वॉड मॅच खेळत आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी केएल राहुलला दुखापत झाली होती, तर सर्फराज खान त्याआधी नेट प्रॅक्टिसदरम्यान जखमी झाला होता. आता दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान, स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना हाताला दुखापत झालेल्या शुबमन गिलच्या रूपाने भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला. अशा स्थितीत पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.

शुबमन गिलने जखमी होताच सोडले मैदान –

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या माहितीनुसार पर्थमधील डब्ल्यूएसीए स्टेडियमवर दुसऱ्या इंट्रा स्क्वॉड मॅचदरम्यान फिल्डिंग करताना शुबमन गिलच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली, त्यानंतर तो लगेच मैदानातून बाहेर पडला. शुबमन गिलने सलामीची जबाबदारी सांभाळली होती, तर यशस्वी जैस्वालच्या पदार्पणानंतर त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणाऱ्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळला नाही, तर अशा परिस्थितीत गिलला सलामीची जबाबदारी दिली जाऊ शकते.

पहिल्या सामन्यात खेळणार की नाही?

शुबमन गिलच्या दुखापतीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी २२ नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. यासाठी अजून वेळ आहे. तोपर्यंत गिल दुखापतीतून सावरला , तर तो पहिल्या कसोटीत खेळेल, अन्यथा तो यातून बाहेर पडेल. गिलने अनेक प्रसंगी भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या दुखापतीमुळे संघाची डोकेदुखी वाढू शकतो. गिलच्या दुखापतीबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ येत्या तीन दिवसांत याबाबत माहिती देऊ शकते.

हेही वाचा – IPL 2025 : जोफ्रा आर्चर-बेन स्टोक्ससह ‘या’ पाच दिग्गज खेळाडूंवर महालिलावात लागणार नाही बोली, जाणून घ्या कारण

शुबमन गिल पहिल्या दिवशी दोनदा फलंदाजीला आला –

इंट्रा स्क्वॉड मॅचच्या पहिल्या दिवसाच्या खेळात शुबमन गिलला दोनदा फलंदाजीची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने पहिल्यांदा २८ धावा केल्या आणि नवदीप सैनीच्या चेंडूवर तो स्लीपमध्ये झेलबाद झाला. यानंतर गिलला दुसऱ्यांदा फलंदाजीची संधी मिळाली, तेव्हा त्याने दिवसअखेरपर्यंत ४२ धावा केल्या. शुबमन गिल त्याच्या कारकिर्दीत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे, ज्यामध्ये गेल्या वेळी जेव्हा टीम इंडियाने गाबा स्टेडियमवर ऐतिहासिक विजय नोंदवला होता, तेव्हा शुबमन गिलने सलामीला खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती.