Shubman Gill breaks Rohit Sharma record most runs in T20 series as captain : टीम इंडियाचा झिम्बाब्वे दौरा आता संपला आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका पार पडली आली. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ४-१ असा विजय मिळवला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत सर्व सामने जिंकून मालिका खिशात घातली. या मालिकेत कर्णधार शुबमन गिलनेही एक खास कामगिरी आपल्या नावावर केली आहे. ज्यामध्ये त्याने रोहित शर्माला मागे टाकले.
शुबमन गिलने हिटमॅनला टाकले मागे –
शुबमन गिलकडे पहिल्यांदाच टीम इंडियाचे कर्णधारपद देण्यात आले होते. गिलने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी पहिली टी-२० मालिका जिंकली. या मालिकेत गिलची कामगिरीही चांगली होती. फलंदाजी करताना गिलने या मालिकेत १७० धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन अर्धशतकेही झळकावली. टी-२० मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा गिल हा दुसरा खेळाडू ठरला आहे.
शुबमन गिल आता रोहित शर्माच्या पुढे गेला आहे. रोहित शर्माने कर्णधार म्हणून २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत १६२ धावा केल्या होत्या. आता शुबमन गिलच्या पुढे फक्त टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीने २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत २३१ धावा केल्या होत्या.
संजू सॅमसनने टी-२० क्रिकेटमध्ये केली मोठी कामगिरी –
संजू सॅमसनसाठी हा षटकार खूप खास होता. या षटकारासह त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीतील ३०० षटकारही पूर्ण केले. टी-२० क्रिकेटमध्ये ३०० षटकार मारणारा तो सातवा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत ३०२ षटकार मारले आहेत. त्याचवेळी संजूने या सामन्यात अवघ्या ३९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४५ चेंडूत एकूण ५८ धावा केल्या. यादरम्यान संजूच्या बॅटमधून एक चौकार आणि ४ षटकार दिसले. हे त्याचे टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक आहे.
टीम इंडियाने पाचवा टी-२० सामना ४२ धावांनी जिंकला –
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना १४ जुलै रोजी हरारे येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकात ६ गडी गमावून १६७ धावा केल्या. टीम इंडियाकडून फलंदाजी करताना संजू सॅमसनने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान झिम्बाब्वेचा संघ १८.३ षटकात १२५ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मुकेश कुमारने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.