Cricket World Cup 2023: नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये तडाखेबाज खेळी करून विश्वचषकासाठी आपण सज्ज असल्याचं दाखवून देणारा सलामीवीर शुबमन गिल पहिल्याच सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिलनं तडकावलेल्या धावा भारतासाठी दिलासादायक बाब ठरली आहे. मात्र, विश्वचषकातील भारताचा पहिलाच सामना ऑस्ट्रेलियाशि येत्या रविवारी होणार असून सलामीच्याच लढतीला भारताचा तडाखेबाज सलामीवीर मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाला ही चिंता सतावू लागली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं झालंय काय?

शुबमन गिलला डेंग्यू झाला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी शुबमन गिल चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियमवर सरावासाठी उतरलाच नाही. त्याच्या डेंग्युच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून त्यासाठी आता शुबमन गिल उपचार घेत आहे. भारतीय संघ व्यवस्थापन शुबमन गिलच्या प्रकृतीवर पूर्ण लक्ष ठेवून असून त्याच्या सुधारणेवरच रविवारचा त्याचा संघप्रवेश अवलंबून असेल. यासंदर्भात शुक्रवारी अर्थात आज त्याच्या आणखी काही चाचण्या घेतल्या जाणार आहेत. जर त्या चाचण्यांमधून अपेक्षित निष्कर्ष आले नाहीत, तर मात्र शुबमन गिल रविवारच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.

शुबमन गिल नाही तर कोण?

शुबमन गिलच्या पुन्हा काही चाचण्या केल्या जाणार आहेत. मात्र, त्यातले निकाल सकारात्मक नसले, तर मात्र भारताला सलामीसाठी वेगळं गणित मांडावं लागेल. रोहित शर्मा व शुबमन गिल या जोडगोळीनं आत्तापर्यंत भारताला बहुतेक सामन्यांमध्ये तडाखेबाज सुरुवात करून दिली आहे. पण गिलच्या अनुपस्थितीत भारताची भिस्त इशान किशन किंवा के. एल. राहुलवर असेल. ही पहिलीच लढत असल्याने यासंदर्भातला निर्णय भारतीय संघव्यवस्थापनाला काळजीपूर्वक घ्यावा लागेल.

World Cup 2023: टीम इंडिया २०११च्या वर्ल्डकप इतिहासाची पुनरावृत्ती करणार का? नव्या सरावाची जर्सी पाहून चाहत्यांनी केल्या मजेशीर कमेंट्स

शुबमन गिलचा फॉर्म!

२०२३ हे वर्ष खऱ्या अर्थानं शुबमन गिलचंच राहिलं आहे. मधल्या काळात वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याला फारशी छाप पाडता आली नाही. मात्र, तो दौरा वगळता पूर्ण वर्षभर शुबमन गिलनं आपल्यातल्या कौशल्याची झलक दाखवली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात त्यानं द्विशतक तडकावलं. वर्षाच्या मध्यावर झालेल्या आयपीएल स्पर्धांमध्येही शुबमन गिल सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्यानं या स्पर्धेत तब्बल ८९० धावा फटकावल्या. त्याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक २०२३मध्येही शुबमन गिलनं सर्वाधिक ३०२ धावा केल्या. गेल्या सात सामन्यांमध्ये त्याची धावसंख्या १०४, ७४, २७, १२१, १९, ५८ आणि ६७ अशी राहिली आहे. यावरून त्याच्या कामगिरीचा अंदाज अगदी सहज येऊ शकेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill tests positive for dengue uncertain about ind vs aus match in world cup 2023 pmw