आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी फक्त ४ दिवसांचा अवधी उरला आहे. भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात हा सामना १८ ते २२ जून असा खेळवला जाईल. हे दोन्ही संघ महामुकाबल्यासाठी सज्ज झाले आहेत. न्यूझीलंडने इंग्लंडला त्यांच्यात भूमीत कसोटी मालिकाविजय नोंदवत भारताला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर भारत आपपसात सामना खेळून सराव करत आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने एका गोष्टीचा खुलासा केला. शुबमन फलंदाजीदरम्यान आपल्यासोबत नेहमी लाल रंगाचा रुमाल ठेवतो. त्याने या रुमालाचे आणि आपले कनेक्शन सांगितले आहे.
द ग्रेड क्रिकेटर यूट्यूब वाहिनीवरील संभाषणादरम्यान शुबमन म्हणाला, ”ही अंधश्रद्धा नाही. वयोगटातील क्रिकेटमधील बहुतेक सामने लाल चेंडूने खेळले जातात. १९ वर्षांखालील विश्वचषकापर्यंत आम्हाला पांढऱ्या चेंडूने क्रिकेट खेळण्याची संधी मिळत नाही. जेव्हा मी पहिल्यांदा पांढऱ्या चेंडूने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा मी हा रुमाल ठेवण्यास सुरवात केली. लाल चेंडूच्या क्रिकेट प्रकारात आपण लाल रुमाल ठेवू शकत नाही, कारण पंच परवानगी देत नाहीत.”
हेही वाचा – मिताली राजने सोशल मीडियावर जिंकली चाहत्यांची मने, ६ वर्षाच्या चिमुरडीला करणार मदत
शुबमन गिलच्या म्हणण्यानुसार, त्याला हा रंग आवडतो आणि त्याची कामगिरीही उत्तम होते. तो म्हणाला, ”मला माहीत नाही का, परंतु मला काही कारणास्तव लाल रंग आवडतो. म्हणूनच मी लाल रुमाल ठेवायला सुरुवात केली. यानंतर तुम्ही धावा जमवता आणि चांगली कामगिरी करता तेव्हा आपल्याला ती गोष्ट पुढे सुरू ठेवण्याची इच्छा असते.”
या मुलाखती दरम्यान शुबमन गिलने अनेक खुलासे केले. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात शुबमनने रोहित शर्माला पहिला चेंडू खेळण्यापासून रोखले होते. त्याने स्वत: स्ट्राइक घेतला आणि त्याचा फटका त्याला सहन करावा लागला. गिल खाते न उघडता त्या सामन्यात बाद झाला होता.