Shubman Gill takes most catches in ODI : टीम इंडियाकडे अनेक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांची फौज आहे. क्षेत्ररक्षकांच्या बाबतीत, सर्वात वर दिसणारे नाव म्हणजे रवींद्र जडेजा किंवा विराट कोहली. पण २०२३ मध्ये या खेळाडूंनी नाही तर युवा फलंदाज शुबमन गिलने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. 2023 मध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत शुभमन गिल अव्वल स्थानावर पोहोचला आहे. एवढेच नाही तर एका कॅलेंडर वर्षात भारताकडून सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रमही गिलच्या नावावर आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युवा फलंदाज शुभमन गिलने २५ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे. १९९८ मध्ये, माजी भारतीय दिग्गज मोहम्मद अझरुद्दीनने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात संपूर्ण वर्षात २३ झेल घेतले होते. वनडेमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम आतापर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. २०१९ मध्ये विराट कोहली या विक्रमापासून दोन झेल दूर होता. कोहलीने त्या वर्षी एकदिवसीय सामन्यात २१ झेल घेतले होते. याशिवाय सध्याचे भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही एका वर्षात भारताकडून एकदिवसीय सामन्यांमध्ये २० झेल घेतले आहेत.

शुबमन गिलने किती झेल घेतले?

शुबमन गिलने या वर्षात वनडेत २४ झेल घेतले आहेत. यावर्षी सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत तो अव्वल आहे. गिलने २९ सामन्यांमध्ये हे २४ झेल घेतले आहेत. दुसऱ्या स्थानावर डेरिल मिशेल आहे, ज्याने २६ सामन्यात २२ झेल घेतले आहेत. गिलने एका सामन्यात सर्वाधिक २ झेल घेतले आहेत, तर डॅरिल मिशेलने एका सामन्यात ३ झेल घेतले आहेत. टॉप-१० मध्ये फक्त दोन भारतीय फलंदाज आहेत. शुबमन गिलशिवाय विराट कोहली आठव्या स्थानावर आहे. कोहलीने यावर्षी वनडेमध्ये २७ सामन्यांत केवळ १२ झेल घेतले.

हेही वाचा – SA vs IND Test : ‘आमचे रबाडा आणि एनगिडी…’, मालिकेपूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकाने टीम इंडियाला दिला इशारा

क्षेत्ररक्षणाबरोबरच फलंदाजीतही शुबमन गिलचा दबदबा कायम आहे. यावर्षी २९ एकदिवसीय सामन्यांमध्ये १५८४ धावा करत गिल अव्वल स्थानावर आहे. या युवा फलंदाजाने ५ शतके आणि २ अर्धशतके झळकावली आहेत. ज्यामध्ये द्विशतकाचाही समावेश आहे. ६ शतके आणि ८ अर्धशतकांच्या मदतीने १३७७ धावा करत विराट कोहलीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill took the most catches in 2023 breaking mohammad azharuddins record 25 years ago in odi cricket vbm