Shubman Gill Women Fan Photo: श्रीलंकेविरुद्ध द्विशतक झळकावल्यानंतर न्यूझीलंड संघासमोर टी२० मध्ये शतक झळकावणारा सलामीवीर शुबमन गिल सध्या चर्चेत आहे. आगामी भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत त्याला संधी दिली जाईल की नाही, याबाबत चर्चा आहे. शुक्रवारी नागपुरात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाने सरावही सुरू केला आहे. दरम्यान, नागपुरातच शुबमन गिलच्या नावाचे मोठमोठे पोस्टर लावण्यात आले आहेत. हे पोस्टर गिलच्या चमकदार कामगिरीचे कौतुक करणारे नाही तर टिंडरवर त्याला लग्नासाठी वधू शोधण्यासाठी सामील होण्याचा एका महिलेच्या प्रस्तावाबद्दल आहे.
टीम इंडियात वेगवान गोलंदाज उमेश यादवचाही समावेश आहे. नुकतेच उमेशने काही मनोरंजक फोटो शेअर केले आहेत. ही छायाचित्रे नागपुरात लावलेल्या होर्डिंग्जची आहेत. होर्डिंगवर शुबमनच्या फॅनचा फोटो चिकटवण्यात आला आहे. त्यावर ‘शुबमन इथे बघायला’ असे लिहिले आहे. हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
पहिल्या कसोटीपूर्वी नागपुरात शहरभर फोटो
भारत-न्यूझीलंड टी२० मालिकेदरम्यान सामना पाहण्यासाठी आलेल्या एका मुलीच्या हातातले पोस्टर व्हायरल झाले होते. या मुलीने पोस्टरमध्ये लिहिले होते, “शुबमनसोबत टिंडर मॅच करा.” खरं तर, टिंडर एक अशी सोशल साइट आहे ज्यावर लोक एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात आणि एकमेकांना डेट करू शकतात. ही सोशल मीडिया साइट तरुणांमध्येही खूप लोकप्रिय आहे. क्रिकेटपटूंना चाहत्यांकडून अशी मागणी नेहमीच येत असते.
टिंडर कंपनीच्या या स्टंटमध्ये आता भारताचा विदर्भ एक्स्प्रेस अशी ओळख असणाऱ्या उमेश यादवनेही शुबमन गिलची फिरकी घेतली आहे. हे पोस्टर्स शेअर करताना उमेशने शुबमन गिलला ट्विटरवर टॅग केले. त्यांनी एकत्र लिहिले, “संपूर्ण नागपूर पाहत आहे. शुबमन, आता बघ. विचार कर…” पुढे तो म्हणाला की, “नागपुरात शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी अनेक रस्त्यांच्या कडेला, खांबांवर आणि दुकानांच्या छतावर गुलाबी रंगाचे मोठमोठे होर्डिंग्ज दिसले. त्यात काय लिहिले आहे यावर प्रथम विश्वास ठेवणे कठीण होते मात्र नंतर मला हसू आवरता येत नव्हते.”
टीम इंडियासोबत सध्या शुबमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी नागपुरातच सरावात व्यस्त आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असूनही गिलला नागपुरात संधी मिळणे कठीण जात आहे. माजी दिग्गज खेळाडू आणि क्रिकेट तज्ञांच्या मते टीम इंडिया सलामीला रोहित शर्मासह केएल राहुलला संधी देईल. सध्या दोन्ही संघ कागदावर तुल्यबळ वाटत आहेत. फिरकी गोलंदाजी ज्याला खेळता आली तोच या मालिकेवर दबदबा कायम राखू शकतो.