दुष्काळ आणि पाण्याची टंचाई या पाश्र्वभूमीवर आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचे महाराष्ट्रातील सामने अन्यत्र हलवण्याची शक्यता आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांनी फेटाळली आहे. आयपीएलच्या ६० सामन्यांपैकी २० सामने महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये होणार आहेत.
‘‘दुष्काळ आणि पाणीटंचाई या मुद्दय़ांवर आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत आहोत. महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव सादर केल्यास आम्ही त्यांना सर्व प्रकारे मदत करायला तयार आहोत. माझ्या खासदार निधीतून व्यक्तिश: काही गावे दत्तक घेण्याची माझी इच्छा आहे. मराठवाडय़ातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी मी प्रयत्न करीन,’’ असे शुक्ला यांनी व्हायवो मोबाइलतर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सांगितले.
मैदानांसाठी मोठय़ा प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. या पाश्र्वभूमीवर आयपीएलचे सामने महाराष्ट्रात खेळवण्यात येऊ नयेत, अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत शुक्ला म्हणाले, ‘‘सामने अन्यत्र हलवण्यामुळे पाणी वाचेल आणि काही शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटेल, असे मला वाटत नाही. खेळासाठी अतिशय थोडय़ा प्रमाणात पाणी लागते. शेतकऱ्यांना मोठय़ा प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. सर्व राजकीय पक्षांनी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी एकत्रित येण्याची गरज आहे.’’
आयपीएलचे सामने अन्यत्र हलवण्याची किंवा वेळापत्रक बदलण्याचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही, असे शुक्ला यांनी स्पष्ट केले. मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी एका जनहित याचिकेद्वारे आयपीएल प्रमुखांना पाण्याच्या वापरासाठी कर भरण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली. खेळपट्टीसाठी दिवसाला ६० हजार लिटर पाण्याची आवश्यकता असते, असे या याचिकेत म्हटले आहे. मुंबई भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनीसुद्धा आयपीएलचे सामने महाराष्ट्रात खेळवू नयेत, अशी मागणी केली आहे. आयपीएलच्या नवव्या हंगामाला ९ एप्रिलला प्रारंभ होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा