South Africa Coach Shukri Conrad warns India : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी यजमान संघाचे प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी टीम इंडियाला मोठा इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी सारखे गोलंदाज पूर्णपणे तयार आहेत. हे गोलंदाज भारताविरुद्ध आग ओकताना दिसतील.
भारताविरुद्धची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाला विश्रांती देण्यात आली होती. त्याला मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही आणि खबरदारी म्हणून तो सरावासाठी प्रथम श्रेणी सामनेही खेळला नाही. लुंगी एनगिडी देखील दुखापतीशी झुंजत होता आणि प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला नव्हता.
कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी पूर्णपणे ताजे आहेत – प्रशिक्षक
मात्र, हे दोन्ही खेळाडू पूर्णपणे ताजेतवाने आहेत आणि त्यामुळेच ते टीम इंडियासाठी मोठा धोका ठरू शकतात, असे मत प्रोटीज संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचे आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना शुक्री कॉनराड म्हणाले, “कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी पूर्णपणे ताजेतवाने असतील आणि मैदानात आग ओकताना दिसतील.”
हेही वाचा – IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
प्रशिक्षक म्हणाले, “मला नेहमीच वाटते की तुम्ही सामन्यासाठी पूर्णपणे ताजेतवाने असले पाहिजे. या खेळाडूंनी प्रथम श्रेणी सामने खेळले असते, तर बरे झाले असते पण असे असूनही मी समाधानी आहे. हे दोन्ही गोलंदाज कसोटी सामन्यांसाठी पूर्णपणे तयार नसते, तरी याची मला चिंता नाही. रबाडा आणि एनगिडी हे १५ सदस्यीय संघाचे भाग आहेत आणि निवडीसाठी उपलब्ध आहेत. आम्ही संघाबाबत उद्या निर्णय घेऊ.”
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अभिमन्यू ईश्वरन, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) प्रसिध कृष्णा आणि केएस भरत (यष्टीरक्षक).
दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, एडन मार्कराम, वियान मुल्डर, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेने, जेराल्ड कोएत्झी, टोनी डी जोर्गी, डीन एल्गर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, केशव महाराज, कीगन पीटरसन.