Lakshya Sen in Paris Olympic 2024 : भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या पाचव्या दिवशी दमदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. बुधवारी त्याने इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला. लक्ष्यला हा सामना जिंकण्यात अडचण आली पण आपल्या दमदार खेळाच्या जोरावर जोनाथनचे आव्हान पार करण्यात तो यशस्वी ठरला. या सामन्यादरम्यान लक्ष्यने असा शॉट खेळला की ते पाहून सगळेच अवाक् झाले. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
लक्ष्य सेनच्या बॅकहँड शॉटने वेधले लक्ष्य –
पहिला गेम खूपच मनोरंजक होता. दोन्ही खेळाडूंना येथे गुण मिळवणे कठीण होते. एकवेळ हा सामना १८-१८ असा बरोबरीत होता. मग लक्ष्ने एक गुण मिळवला. यानंतर पुढच्या गुणासाठी दोघांमध्ये अप्रतिम लढत पाहिला मिळाली. त्यानंतर जोनाथनने कोर्टच्या उजव्या कोपऱ्यातून एक शॉट खेळला जो लक्ष्याच्या आवाक्याबाहेर होता. लक्ष्य कोर्टाच्या मध्यभागी उभा होता. लक्ष्यने फक्त शटल त्याच्यापासून दूर असल्याचे पाहिले आणि अशा परिस्थितीत त्याने न पाहता पाठीमागून हात पुढे केला आणि शटलला रॅकेटशी कनेक्ट केले. लक्ष्य सेनचा हा बॅकहँड शॉटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याची शैली चाहत्यांना खूप आवडत आहे.
लक्ष्य आणि जोनाथन यांच्यात चुरशीची लढत –
लक्ष्य सेनने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा २१-१८, २१-१२ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या विजयासह लक्ष्यने उपांत्यपूर्व फेरी गाठली. लक्ष्यने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूविरुद्ध पहिल्या गेममध्ये ८-१ ने जबरदस्त पुनरागमन करत गुणसंख्या ८-८ अशी बरोबरी साधली आणि नंतर पहिल्या मिडवे ब्रेकमध्ये ११-९ अशी आघाडी घेतली. यानंतर दोघांमध्ये चुरशीची लढत झाली. एका वेळी १८-१८ अशी बरोबरी होती. मात्र, त्यानंतर लक्ष्यने जोरदार कमबॅक करत २१-१८ असा विजय मिळवला.
हेही वाचा – Sreeja Akula : कोण आहे श्रीजा अकुला, जिने आपल्या वाढदिवशी ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचत देशाला दिले खास गिफ्ट
‘करो या मरो’च्या लढतीत लक्ष्य सेनने मारली बाजी –
पहिला गेम जिंकल्यानंतर लक्ष्यने दुसऱ्या गेममध्येही चांगली सुरुवात केली. मध्यांतराच्या ब्रेकमध्ये लक्ष्य पुन्हा आघाडीवर होता. यानंतर लक्ष्यने दुसरा गेम २१-१२ असा सहज जिंकला. हा सामना ५० मिनिटे चालला. लक्ष्यने पहिला गेम २८ मिनिटांत तर दुसरा गेम २३ मिनिटांत जिंकला. दोन्ही खेळाडूंसाठी ही लढत करो या मरो’ अशी होती. लक्ष्यने क्रिस्टीचा पराभव करून त्याचा पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात आणला.