भारताचा बॉक्सर श्याम काकराने सोफिया (बल्गेरिया) येथे सुरू असलेल्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक मारून पदक निश्चित केले आहे. या कामगिरीसह श्यामने युवा ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीटही मिळवले आहे.
चुरशीच्या झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत आंध्र प्रदेशच्या श्यामने ४९ किलो वजनी गटात व्हेनेझुएलाच्या योएल फिनोल याच्यावर २-१ अशी मात केली. उपांत्य फेरीतील प्रवेशामुळे त्याने किमान कांस्यपदक निश्चित केले आहे. नानजिंग (चीन) येथे १६ ते २८ ऑगस्टदरम्यान होणाऱ्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे. श्यामला पुढील फेरीत कझाकस्तानच्या शाल्कार अखिनबाय याचा सामना करावा लागेल. गौरव सोळंकीला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. चीनच्या एल. व्ही. पिंग याने त्याला ३-० असे पराभूत केले. पदकाच्या शर्यतीतील आव्हान संपुष्टात आले तरी त्याला युवा ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी लढत द्यावी लागणार आहे.  
‘‘हा माझ्या कारकीर्दीतील आजपर्यंतचा मोठा विजय आहे. युवा ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणे, हा माझ्यासाठी संस्मरणीय क्षण आहे,’’ असे विजय मिळवल्यानंतर श्यामने सांगितले. 

Story img Loader