सिद्धेश लाडने तळाचा फलंदाज जावेद खानला साथीला घेऊन पहिल्या डावात आघाडी मिळवण्याच्या ईष्रेने किल्ला लढवला आहे. त्यामुळे रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेतील कर्नाटकविरुद्धच्या लढतीत मुंबईने दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद २१७ अशी मजल मारली आहे. मुंबईचा संघ आता आपल्या प्राथमिक लक्ष्यापासून फक्त ३४ धावांच्या अंतरावर आहे.
कर्नाटकचा वेगवान गोलंदाज एच. एस. शरथ आणि लेग-स्पिनर श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी तीन बळी घेत मुंबईच्या आघाडीच्या फळीला तंबूची वाट दाखवली. त्यामुळे मुंबईची अवस्था ७ बाद १६१ अशी झाली. परंतु लाडने जावेद खानसोबत आठव्या विकेटसाठी ५६ धावांची नाबाद भागीदारी रचत संघाचा डाव सावरला.
कर्नाटकचा डाव सकाळच्या सत्रात २५१ धावांवर आटोपला. मग मुंबईचा फॉर्मात असलेला सलामीवीर आदित्य तरे हा शरथचा पहिला बळी ठरला. त्यानंतर मुंबईची स्थिती ५ बाद ९९ झाली असताना सिद्धेश लाड मैदानावर आला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक शतक खात्यावर असणाऱ्या सिद्धेशने जिद्दीने कर्नाटकच्या गोलंदाजांचा सामना केला. या २१ वर्षीय युवा फलंदाजाने दोरायस्वामी सुब्रमण्यम (१५) आणि शार्दुल ठाकूर (१८) यांच्यासोबत सहाव्या आणि सातव्या विकेटसाठी अनुक्रमे ३० आणि ३२ धावांच्या भागीदाऱ्या रचल्या.
त्याआधी, रविवारच्या ७ बाद २२८ धावसंख्येवर आपला पहिला डाव पुढे सुरू करणाऱ्या कर्नाटला आणखी २३ धावांची सोमवारी भर घालता आली. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने सकाळी दोन बळी घेत आपल्या खात्यावर ६५ धावांत ४ बळी जमा केले. कर्नाटकचा शतकवीर फलंदाज लोकेश राहुल आपल्या धावसंख्येत १३ धावांची भर घालून १३३ धावांवर धावचीत झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संक्षिप्त धावफलक
कर्नाटक (पहिला डाव) : ९८.३ षटकांत सर्व बाद २५१ (लोकेश राहुल १३३, स्टुअर्ट बिन्नी ३८; शार्दुल ठाकूर ४/६५, विशाल दाभोळकर २/८२)
मुंबई (पहिला डाव) : ७६ षटकांत ७ बाद २१७ (हिकेन शाह ४४, सिद्धेश लाड खेळत आहे ५९, जावेद खान खेळत आहे ३३; एच. एस. शरथ ३/३२, श्रेयस गोपाळ ३/५२)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddesh lads unbeaten 59 keeps mumbai in hunt for lead