मुंबईचा आंतरराष्ट्रीय धावपटू सिद्धांत थिंगलियाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळवीत कौतुकास्पद कामगिरी केली. सायकलिंग आणि तलवारबाजीत महाराष्ट्राला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
अमेरिकेत अ‍ॅथलेटिक्सचे प्रशिक्षण घेणाऱ्या सिद्धांतने ११० मीटर अंतराची शर्यत १३.८३ सेकंदांत पार केली. त्याने सुरेंद्र जयकुमार (तामिळनाडू) व के. प्रेमकुमार (तेलंगणा) यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर मागे टाकत हे यश मिळविले. त्याने पुण्यात झालेल्या आशियाई मैदानी स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. ४०० मीटर अडथळा शर्यतीत सेनादलाच्या दुर्गेशकुमार याला सुवर्णपदक मिळाले. त्याने हे अंतर ५०.६६ सेकंदात पार केले. हातोडाफेकीत सेनादलाच्या नीरजकुमार (६४.६२ मीटर) याने सोनेरी कामगिरी केली.
तलवारबाजीमध्ये इपी सांघिक प्रकारात अजिंक्य दुधारे, दिनेश वंजारे, महेश तावर, मयुर विधाते यांच्या संघाने कांस्यपदक मिळवले. महिलांमध्ये सेबर प्रकारात अर्चना लाड, अस्मिता दुधारे, निशा पुजारी आणि स्नेहल विधाते यांच्या संघाने कांस्यपदकावर नाव कोरले,
सायकलिंगमध्ये कांस्य
महाराष्ट्राने सायकलिंगमध्ये आणखी एका पदकाची कमाई केली. अरविंद पन्वर, गणेश पवार, अभिनंदन भोसले व हरप्रीतसिंग यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने चार किलोमीटर अंतराच्या सांघिक कौशल्य शर्यतीत तिसरे स्थान मिळविले. सेनादल (४ मि.४३.३८५ सेकंद) व हरयाणा (४ मि.४९.९४५ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.
बास्केटबॉलमध्ये पराभूत
महाराष्ट्राच्या महिला संघाला बास्केटबॉलमध्ये उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना तामिळनाडूने ६४-५८ असे हरविले. पूर्वार्धात ३३-२३ अशी आघाडी घेणाऱ्या तामिळनाडू संघाकडून पी.अनिता व सुनीताकुमारी यांनी उल्लेखनीय खेळ केला. महाराष्ट्राच्या श्रुती मेनन व मनीषा डांगे यांची लढत अपुरी ठरली.
कबड्डीत महिला अंतिम फेरीत
महाराष्ट्राच्या महिला संघाने हरयाणावर मात करत अंतिम फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीच्या लढतीत महाराष्ट्राने हरयाणावर २९-२२ असा विजय मिळवला. कर्णधार सायली किरीपाळेसह अभिलाषा म्हात्रे, स्नेहल शिंदे आणि मीनल जाधव यांनी सुरेख खेळ करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा