अखेरच्या दिवशी ‘खडूस’ खेळीचा नजराणा; दुसऱ्या डावात मुंबई ७ बाद २६०
मुंबईच्या पाचशेव्या रणजी सामन्यात संघाच्या बिकट परिस्थितीमुळे मी दुखावलो होतो, परंतु सामना वाचवायचा ही खूणगाठ मनाशी बांधली. त्यामुळेच हे साध्य करू शकलो, याचा आनंद सर्वात जास्त आहे, अशा भावना मुंबईसाठी पुन्हा एकदा संकटमोचक ठरलेल्या सिद्धेश लाडने झुंजार खेळी साकारल्यावर व्यक्त केल्या.
सामन्यानंतर भावुकपणे प्रतिक्रिया व्यक्त करताना सिद्धेश म्हणाला, ‘‘मुंबई डावाने पराभवाच्या उंबरठय़ावर होती. त्यामुळे शनिवारी रात्रीच मी ठरवले, काही झाले तरी बाद व्हायचे नाही. बडोद्याचे १० खेळाडू माझ्या अवतीभोवती होते. त्यांच्याकडून बरेच शाब्दिक हल्लेही होत होते. पण त्याचा माझ्या एकाग्रतेवर काहीही परिणाम झाला नाही. प्रत्येक चेंडू खेळून काढायचे मी ठरवले. संघाला जशी गरज असते तसा मी खेळतो. त्यामुळेच या खेळीचा आनंद वेगळा आहे.’’
मुंबईला नमवण्यासाठी बडोद्याने सर्वस्व पणाला लावले होते. त्यांना मुंबईचा गड जिंकायचा होता, पण त्यांच्या या मार्गात बाजीप्रभूंसारखा खंबीरपणे उभा ठाकला तो सिद्धेश. त्यामुळे वानखेडेवर गडही गेला नाही आणि सिंहही. सिद्धेशने ही खडूस खेळी साकारली नसती तर मुंबईवर वानखेडेवर पहिल्यांदाच डावाने पराभूत होण्याची नामुष्की ओढवली असती. सिद्धेशने तब्बल ३०२ मिनिटे किल्ला लढवत २३८ चेंडूंत सात चौकारांसह नाबाद ७१ धावांची मुंबईच्या क्रिकेटला साजेशी चिवट खेळी साकारली. त्याच्या खेळीमुळे मुंबईने डावाचा पराभव टाळत सामना अनिर्णित राखला. मुंबईने दुसऱ्या डावात सात फलंदाजांच्या मोबदल्यात २६० धावा केल्या.
रणजी स्पर्धेच्या इतिहासात जवळपास पहिल्यांदाच मुंबईच्या फलंदाजांच्या बाजूला १० क्षेत्ररक्षक उभे असल्याचे पाहायला मिळाले. पण या परिस्थितीतूनही सिद्धेशने मुंबईला तारले. आपल्या बॅटची ढाल करत तो प्रत्येक चेंडूगणिक येणारा वार परतवत होता. त्याची मान जायबंदी झाली होती. बरेच षटके क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर मुंबईसाठी तारणहाराची भूमिका बजावताना त्याच्या मानेमध्ये चमक आली होती. मैदानात काही मिनिटांनी फिजिओ येऊन त्याच्यावर उपचार करत होते. पण अशा परिस्थितीत जिद्दी सिद्धेशने मैदान सोडले नाही. एकदा त्याला जीवदानही मिळाले. पण हा अपवाद वगळता रविवारचा दिवस सिद्धेशच्याच नावावर राहिला. अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव यांनी अपेक्षाभंग केला.
मुंबईने दिवसाची सावध सुरुवात केली. ४१व्या चेंडूवर मुंबईच्या खात्यात पहिला चौकार जमा झाला. सूर्यकुमार यादवची ही दिवसातली पहिली धाव होती. जलपानापर्यंत सारे काही आलबेल होते. पण त्यानंतर पहिल्याच चेंडूवर भरवशाचा समजला जाणारा अजिंक्य त्रिफळाचीत झाला. स्वप्निल सिंगच्या सरळ चेंडूवर अजिंक्य फसला. पहिल्या सत्रात बडोद्याला फक्त एका बळीवरच समाधान मानावे लागले. उपाहारावेळी मुंबईने ५ बाद १६३ अशी मजल मारली होती. उपाहारानंतर सिद्धेश लाडने ६७व्या षटकात दोन खणखणीत चौकार लगावले. सूर्यकुमार (४४) आणि सिद्धेश ही जोडी मुंबईला तारणार असे वाटत होते, पण दीपक हुडाच्या ७५व्या षटकाच्या अखेरचा चेंडू ‘कट’ करण्याच्या नादात सूर्यकुमारही त्रिफळाचीत झाला. त्यानंतर एका बाजूने सिद्धेश किल्ला लढवत असताना त्याला अभिषेक नायरने चांगली साथ दिली. ८१व्या षटकात दोन खणखणीत कव्हर ड्राइव्ह लगावत ११४ चेंडूंत त्याने अर्धशतक पूर्ण केले.
सामन्याला कलाटणी देणारी गोष्ट घडली ती ९०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर. स्वप्निल सिंगच्या गोलंदाजीवर सिद्धेश मोठा फटका मारायला गेला. पण चेंडू बॅटच्या कडेला लागला आणि सागर मानगालोरकरने झेलही टिपला. सारेच स्तब्ध झाले होते. मुंबईच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले; पण पंचांनी या वेळी ‘नोबॉल’ आहे की नाही याची विचारणा तिसऱ्या पंचांकडे केली. काही वेळात हा चेंडू ‘नोबॉल’ असल्याचे समजले आणि सिद्धेशसह मुंबईला जीवदान मिळाले. याबाबत सिद्धेश म्हणाला, ‘‘मी जर फक्त बचाव करत राहिलो असतो तर बडोद्याचा संघ वरचढ ठरू शकला असता. त्यामुळे एखादा चौकार लगावण्याचा विचार माझ्या मनात होता. तो चेंडू चौकार मारण्यासाठी चांगला होता. पण मी बचाव करत असल्याने बॅट थोडी उशिरा वर आली. जर हा फटका मी पूर्ण खेळलो असतो तर तो निश्चितच सीमारेषेपार गेला असता.’’
हे जीवदान मिळाल्यावर सिद्धेश आणि अभिषेक या दोघांनी चिवट फलंदाजी केली. अनिवार्य षटके सुरू झाल्यावर बडोद्याच्या गोलंदाजांनी चेंडू आणि शब्दांद्वारे आग ओकायला सुरुवात केली होती. चौथ्या अनिवार्य षटकात अभिषेकला कार्तिक काकडेने बाद केले आणि मुंबईच्या गोटात शांतता पसरली. सामना वाचवण्यासाठी अभिषेकने १०८ चेंडूंत ८ धावा केल्या. सिद्धेश आणि अभिषेक यांनी २१६ चेंडू खेळून काढत ५० धावांची भागीदारी रचली. अभिषेक बाद झाल्यावर सिद्धेशने धवल कुलकर्णीसह चौथा दिवस खेळून काढण्याची जबाबदारी चोख निभावली.
संक्षिप्त धावफलक
- मुंबई (पहिला डाव) १७१
- बडोदा (पहिला डाव) : ५७५
- मुंबई (दुसरा डाव) : १२०.४ षटकांत ७ बाद २६० (सिद्धेश लाड नाबाद ७१, पृथ्वी शॉ ५६; कार्तिक काकडे २/५०, स्वप्निल सिंग २/५५).