३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेआधी टीम इंडियावरचं मोठं संकट टळलं आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला सरावादरम्यान झालेली दुखापत गंभीर नसल्याचं कळतंय. शुक्रवारी सरावादरम्यान खलिल अहमदचा चेंडू विजय शंकरच्या हातावर आदळला. यानंतर टीम इंडियाच्या फिजीओथेरपिस्ट पॅट्रीक फराहत व वैद्यकीय टीमने विजय शंकरला झालेल्या दुखापतीचं स्कॅनिंग केलं.
यानंतर शनिवारी आलेल्या अहवालात विजय शंकरला झालेली दुखापत गंभीर नसल्याचं समोर आलं आहे. शनिवारी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात विजय शंकरला संघ व्यवस्थापनाने विश्रांती दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशविरुद्ध सराव सामन्यातही विजय शंकर खेळणार नसल्याचं कळतंय. त्यामुळे पहिल्या सामन्याआधी विजय शंकर दुखापतीमधून सावरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.