Sikandar Raza completes 2000 runs in T20I cricket : भारतीय संघाने चौथ्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा १० गडी राखून पराभव केला. या सामन्यातील विजयासह टीम इंडियाने मालिकेत ३-१ अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाला मोठी धावसंख्या करता आली नाही. झिम्बाब्वे संघाने ७ गडी गमावून १५२ धावा केल्या. यामध्ये सर्वाधिक ४६ धावांचे योगदान कर्णधार सिकंदर रझाने दिले. सिकंदर रझाने या खेळीच्या जोरावर एक मोठा पराक्रम केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिकंदर रझाने झिम्बाब्वेसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा करणारा तो झिम्बाब्वे संघाचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने आणखी एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा करणारा आणि ५० पेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो जगातील पाचवा खेळाडू ठरला आहे. सिकंदर रझाने भारताविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात ही कामगिरी केली. याशिवाय सिकंदर रझानेही भारताविरुद्ध आपली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या नोंदवली आहे. भारताविरुद्ध त्याला आतापर्यंत केवळ ३४ धावा करता आल्या होत्या.

सिकंदर रझा हा पराक्रम करणारा झिम्बाब्वेचा पहिलाच खेळाडू –

हरारे येथे भारताविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाने १३व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर १७वी धाव घेताच, तो झिम्बाब्वेसाठी २००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. झिम्बाब्वेसाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सीन विल्यम्स दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने झिम्बाब्वेकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६९१ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर हॅमिल्टन मसाकादजा आहे, ज्याने १६६२ धावा केल्या आहेत. झिम्बाब्वे संघाच्या कर्णधाराने भारताविरुद्ध ४६ धावांची इनिंग खेळली. ही त्याची भारताविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या होती.

हेही वाचा – IND vs SL : भारताच्या श्रीलंका दौऱ्याचे सुधारित वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या आता कधी होणार सामने?

सिकंदर रझा जगातील पाचवा अष्टपैलू खेळाडू –

सिकंदर रझा हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० हून अधिक धावा करणारा आणि ५० पेक्षा जास्त बळी घेणारा जगातील पाचवा अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. अशी कामगिरी करणारा तो झिम्बाब्वेचा पहिला अष्टपैलू खेळाडू आहे. त्याच्याशिवाय बांगलादेशचा शाकिब अल हसन (२५५१ धावा आणि १४९ विकेट्स), अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी (२१६५ धावा आणि ९६ विकेट्स), मलेशियाचा विरनदीप सिंग (२३२० धावा आणि ६६ विकेट्स) आणि पाकिस्तानचा मोहम्मद हाफीज (२५१४ धावा आणि ६१ विकेट्स). आता सिकंदर रझाने टी-२० मध्ये २००० हून अधिक धावा आणि ६५ विकेट्स घेतल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sikandar raza became the first zimbabwean to score 2000 runs in t20 cricket during ind vs zim 4th t20i match vbm
Show comments