Sikandar Raza breaks Shaun Williams’ record for fastest ODI century for Zim: झिम्बाब्वेने नेदरलँड्सवर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. विश्वचषक २०२३ च्या पात्रता फेरीतील झिम्बाब्वेचा हा दुसरा विजय आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या विश्वचषक पात्रता फेरीत, सिकंदर रझाने प्रथम गोलंदाजीने कहर केला आणि चार विकेट्स घेतल्या. त्यानंतर झिम्बाब्वेच्या एकदिवसीय इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम केला. रझाने केवळ ५४ चेंडूत शतक ठोकले.या शतकासह तो झिम्बाब्वेसाठी सर्वात वेगवान शतक ठोकणारा अव्वल खेळाडू ठरला.
५५ चेंडू शिल्लक असताना झिम्बाब्वेने मिळवला दणदणीत विजय –
३१६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाचव्या क्रमांकावर उतरलेल्या सिकंदर रझाने ५४ चेंडूत ६ चौकार आणि ८ षटकार मारले. त्याने १८८.८९ च्या स्ट्राईक रेटने नाबाद १०२ धावा केल्या. या स्फोटक फलंदाजीमुळे त्याने आपल्या संघाला ५५ चेंडू शिल्लक असताना ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे त्याने अवघ्या दोन दिवसांतच वेगवान शतकाचा विक्रम मोडीत काढला.
दोनच दिवसांपूर्वी विल्यम्सने झळकावले होते सर्वात वेगवान शतक –
खरे तर दोन दिवसांपूर्वी झिम्बाब्वेचा अनुभवी फलंदाज शॉन विल्यम्सने नेपाळविरुद्ध ७० चेंडूत शतक झळकावले होते. यापूर्वी हा विक्रम ब्रँडन टेलरच्या नावावर होता, ज्याने २०१५ च्या विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध ७९ चेंडूत शतक झळकावले होते. सिकंदर रझाने मंगळवारी दोघांचे विक्रम मोडले. रझा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. तो सर्व फॉरमॅटमध्ये झिम्बाब्वेसाठी सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे.
झिम्बाब्वेसाठी वनडेत वेगवाने शतक झळकावणारे फलंदाज –
१. सिकंदर रझा – ५४ चेंडू
२. शॉन विल्यम्स – ७० चेंडू
३. रेगिस चकबवा – ७३ चेंडू
४. ब्रेंडन टेलर – ७९ चेंडू
सिकंदर रझाने आपल्या गोलंदाजीत सलामीवीर विक्रमजीत सिंगला ८८ धावांवर, मॅक्स ओ’डॉडला ५९ धावांवर, वेस्ली बरेसीला ४ धावांवर आणि बास डी लीडला ४ धावांवर तंबूत पाठवले. विशेष म्हणजे यापैकी त्याने तीन फलंदाजांना क्लीन बोल्ड केले.