महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सर्वांत जास्त चर्चा झाली ती सिकंदर शेखची. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात सामना झाला होता. या सामन्यात सिकंदर शेखला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तसेच, पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे सिकंदर शेखवर अन्याय झाल्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे. यावर आता सिकंदर शेखने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘एबीपी माझा’शी बोलताना सिकंदर शेखर म्हणाला की, “उपांत्य कुस्तीत टांग ( पूर्ण पाठीवर पडणे ) लागली होती, तिथे व्यवस्थित टांग बसली नाही. एका खांद्यावर मी पडलो असून, त्याला ( महेंद्र गायकवाड ) दोन तर मला एक गुण द्यायला पाहिजे होतं. असं ४-३ ने कुस्ती चालायला हवी होती. पण, दोनऐवजी ४ गुण समोर पैलवानला देण्यात आलं.”
“माझा ताबा असतानाही समोरील पैलवानाला ४ गुणे देणं चुकीचं आहे. सामन्याचे समोरील बाजूचे व्हिडीओ दाखवण्यात आलं. पण, पाठीमागील बाजूचं काहीच दाखवलं गेलं नाही. स्पर्धेसाठी पूर्ण तयारी करुन गेलो होतं. यंदा मी महाराष्ट्र केसरी झालो असतो,” असं सिकंदर शेखने म्हटलं आहे.
तसेच, सामन्यातील पंचांना धमकीचा फोन करण्यात आला आहे. यावरही सिकंदर शेखने स्पष्टीकरण दिलं आहे. “संग्राम कांबळे हे पहिल्यापासून गंगावेश तालमीचे फेसबुक अकाउंट चालवत आहे. त्यांना कुठेतरी वाईट दिसलं, म्हणून ते बोलले आहेत. सगळीकडे रेकॉर्डिग व्हायरल झालं आहे. कोणतीही धमकी देण्यात आली नाही. फक्त तुम्ही असं का केलं ही विचारणा केली आहे,” असं सिकंदर शेखने सांगितलं आहे.