जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेचे रौप्यपदक जिंकणाऱ्या भारताच्या किदम्बी श्रीकांतने ताज्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत चार स्थानांनी आगेकूच करीत अव्वल १० स्थानांमध्ये मुसंडी मारली आहे.
ह्युएल्व्हा (स्पेन) येथे झालेल्या जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवल्यामुळे गुंटूरच्या २८ वर्षीय श्रीकांतला क्रमवारीत १०वे स्थान मिळवता आले आहे. जागतिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या युवा लक्ष्य सेनने दोन स्थानांनी सुधारणा करीत १७वे स्थान मिळवले आहे, तर बी. साईप्रणीतची दोन स्थानांनी घसरण झाली असून, तो १८व्या क्रमांकावर आहे. उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या एचएस प्रणॉयने सहा स्थानांनी आगेकूच करीत २६वा क्रमांक मिळवला आहे.
महिला एकेरीत दोन ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू सातव्या क्रमांकावर कायम आहे, तर दुखापतीमुळे जागतिक स्पर्धेतून माघार घेणारी सायना नेहवाल २५व्या क्रमांकावर आहे.
पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्त्विक साईराज रंकीरेड्डी जोडीची एका स्थानाने घसरण झाली असून, ते १०व्या स्थानावर आहेत. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी यांना अव्वल २० स्थानांमध्ये पुन्हा मजल मारण्यात यश आले आहे.