तुषार वैती

ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करताना ही स्पर्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. त्यामुळे ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत मिळवलेले रौप्यपदक माझ्यासाठी खूप मोलाचे आहे, असे मत महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबत हिने व्यक्त केले.

करोनाच्या काळात संपूर्ण जगात अनिश्चिततेचे वातावरण असताना यापुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतील की नाही, याची कुणालाही कल्पना नाही. वर्षभरानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरताना कामगिरी कशी होईल, याबाबत साशंक होते. या स्पर्धेत माझी सुरुवातही निराशाजनक झाली होती. त्यानंतर रौप्यपदकापर्यंत झेप घेता आल्याने मी समाधानी आहे, असेही राहीने नमूद केले.

महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या तीन नेमबाजांनी वर्चस्व गाजवले. चिंकी यादव, राही आणि मनू भाकर यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली. या कामगिरनंतर राहीने सांगितले की, ‘‘करोनानंतरची ही माझी पहिली स्पर्धा होती. गेले तीन महिने आम्ही अंदाजानेच सराव करत होतो. याआधी ऑलिम्पिकसाठी सराव करताना आम्ही अनेक स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचो. पण आता तशी परिस्थिती नाही. यापुढे स्पर्धा होतील की नाही, हे माहित नाही. त्यामुळे सरावाच्या दृष्टीने या स्पर्धेचे महत्त्व खूप होते. त्यातच मिळवलेले हे रौप्यपदक माझ्यासाठी संस्मरणीय आहे.’’

भारताने या प्रकारात तिन्ही पदके मिळवलीत, त्याबाबत राही म्हणाली की, ‘‘तिन्ही पदके भारताच्या नावावर नोंदली गेल्याने बरे वाटले. कुणाला पदक मिळाले, यापेक्षा भारताने तिन्ही पदके जिंकली, याचा डंका संपूर्ण जगात पिटला गेला, याचा विशेष आनंद होत आहे. पहिल्या दोन मालिकांमध्ये माझी कामगिरी खराब झाली होती. पहिल्या मालिकेत पाचपैकी एक आणि दुसऱ्या मालिकेत दोन गुण मला मिळवता आले होते. माझ्याकडून ही कामगिरी अपेक्षित नव्हतीच. पण नंतरच्या मालिकांमध्ये मी जोमाने पुनरागमन केले. त्यामुळे माझ्या एकूण कामगिरीबाबत मी समाधानी आहे.’’

Story img Loader