Ashes 2023, ENG vs AUS: लॉर्ड्सवर नुकत्याच पार पडलेल्या कसोटीत जॉनी बेअरस्टोला केलेले रनआउट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या संदर्भात काहींनी दाखविलेल्या “ढोंगीपणा आणि सातत्याचा अभाव” यावर टीका करताना, माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) एलिट पॅनेलचे अंपायर सायमन टॉफेल म्हणाला की, “जेव्हा लोकांना क्रिकेटच्या कायद्यानुसार बाद करण्याचा प्रकार आवडत नाही तेव्हा ते खिलाडूवृत्तीबाबत बोलतात.”
दुसऱ्या अॅशेस कसोटीत बेअरस्टोच्या वादग्रस्त स्टंपिंगनंतर, इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि कर्णधार बेन स्टोक्स यांसारख्या लोकांनी ते खेळ भावनेच्या विरोधात असल्याचे सांगितले. टॉफेलने ‘लिंकडिन’वर एका लांबलचक पोस्टमध्ये यावर उत्तर देताना लिहिले आहे की, “माझा अनुभव असा आहे की जेव्हा लोकांना क्रिकेटच्या कायद्यांतर्गत ज्या प्रकारे बाद केले जाते ते आवडत नाही, तेव्हा ते त्यांच्या दृष्टिकोनाचे समर्थन करण्यासाठी खेळाच्या भावनेचा हवाला देतात.”
टॉफेलने ‘लिंकडिन’ वर एका लांबलचक पोस्टमध्ये पुढे लिहिले, “लॉर्ड्सवर जॉनी बेअरस्टोला बाद करणे हे क्रीडा भावनेचे उल्लंघन होते का? विकेटकीपरच्या मागे उभे राहून स्टंपिंग करण्याचा प्रयत्न करण्याची परवानगी नाही असे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सांगणारे तुम्ही अंपायर पाहिले आहे का?” टॉफेल पुढे म्हणाला, “पहिल्या डावात जेव्हा बेअरस्टोने मार्नस लाबुशेनला अशा प्रकारे बाद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोणी तक्रार केली होती का? त्याच्या डिसमिसबद्दल जॉनी बेअरस्टो काहीच बोलला नाही. तो एकदम गप्प राहिला. का?”
बेअरस्टो बाद झाल्यानंतर उर्वरित सामन्यात ऑस्ट्रेलियाला प्रेक्षकांच्या वाईट वागणुकीला सामोरे जावे लागले. प्रेक्षकांनी पाहुण्या संघाच्या चांगल्या खेळीला दाद दिली नाही आणि ‘तेच जुने ऑस्ट्रेलियन, नेहमी फसवणूक करणारे’ असे उलट्या घोषणा केल्या. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांव्यतिरिक्त अनेक माजी आणि सध्याच्या खेळाडूंनी या विषयावर आपली मते मांडली. टॉफेलने यावर लिहिले, “काही लोक आणि गटांनी दाखवलेला ढोंगीपणा व सातत्याचा अभाव आमच्या खेळाच्या भविष्यासाठी खूपच चिंताजनक आहे. कदाचित इथे फक्त मी माझे हे मत मांडत आहे.”
बेअरस्टो कसा वादग्रस्तपणे धावबाद झाला?
जॉनी बेअरस्टो आपल्या सहकारी फलंदाजाशी बोलण्यासाठी चेंडू खेळल्यानंतर क्रीजच्या बाहेर आला, पण अॅलेक्स कॅरीने त्याला धावबाद केले. कॅरीची ही कृती नियमानुसार योग्य होती. मात्र, ते खेळाच्या भावनेविरुद्ध होते. आता ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यात खूप पुढे गेला आहे. आगामी लढतींमध्ये आणखी वाद होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, बेअरस्टो हा रन आउटचा क्षण कधीच विसरणार नाही. दुसरीकडे सोशल मीडियावर खिलाडूवृत्तीची चर्चा अधिक रंगली आहे. ऑस्ट्रेलियावर नेहमीच रडीचा डाव, चीटिंग असे आरोप होत असतात.