नवी दिल्ली : जागतिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती सिमरनजीत कौर (६० किलो) आणि जीबी स्पर्धेतील कांस्यपदक विजेता दिनेश डगर (६९ किलो) यांनी इंडोनेशियातील लाबूअन बाजो येथे सुरू असलेल्या २३व्या प्रेसिडेंट चषक बॉक्सिंग स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे.

सिमरनजीत हिने एकापाठोपाठ अप्रतिम ठोसे लगावत इटलीच्या फ्रान्सेस्का मार्टूसिएलो हिचा ५-० असा धुव्वा उडवून अंतिम फेरीत मजल मारली. तिला आता विजेतेपदासाठी इंडोनेशियाच्या हसना हुसवाटून हिचा सामना करावा लागेल. दिनेशने इंडोनेशियाच्या नॉमेओ डेफरी याला ५-० असा सहज हरवत अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत दिनेशने आतापर्यंत एकही गुण न गमावता सर्व लढती जिंकल्या आहेत. त्याला अंतिम फेरीत इंडोनेशियाच्या सामदा सापुत्रा याच्याशी दोन हात करावे लागतील.

अंकुश दहिया (६४ किलो) आणि अनंत चोपडे (५२ किलो) यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले. चोपडेने इंडोनेशियाच्या फाहमी मुहमद याच्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवल्यामुळे पंचांनी त्याला विजयी घोषित केले.

 

 

Story img Loader