लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालला हाँगकाँग सुपर सीरिजमध्ये दुसऱ्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या चीनच्या वँग लिनने सायनावर २१-१९, २१-१५ अशी सरळ गेममध्ये मात केली. वँगने स्मॅशच्या फटक्यांचा वापर करत वर्चस्व गाजवले. सायनाविरुद्ध आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यात वँगने ३-२ अशी सरशी साधली.
डेन्मार्क खुल्या स्पर्धेत जेतेपदानंतर गुडघ्याच्या दुखापतीमुळे सायनाला चीन सुपर सीरिज स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. हाँगकाँग स्पर्धेद्वारे कोर्टवर परतणाऱ्या सायनाने पहिल्या फेरीत सहज विजय मिळवत चांगली सुरुवात केली होती. मात्र दुसऱ्याच फेरीत सायनाचे आव्हान संपुष्टात आले.
पहिल्या गेममध्ये वँगने ४-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सायनाने ६-६ बरोबरी साधली. मात्र दोघींनीही तोडीस तोड खेळ केला. अखेर वँगने सायनावर वर्चस्व गाजवत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये वँगने ६-१ अशी दमदार आघाडी घेतली आणि ही आघाडी कायम राखत दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला. पुरुषांमध्ये कश्यपने इंडोनेशियाच्या टॉमी सुगिर्तोविरुद्धच्या सामन्यातून दुखापतीमुळे माघार घेतली. ली चोंग वेईने अजय जयरामवर २१-१८, २१-१९ अशी मात केली. महिला तसेच मिश्र दुहेरीतही भारताला विजय मिळू शकला नाही.

Story img Loader