पी. व्ही. सिंधू आणि अजय जयराम यांनी विजयी घोडदौड कायम राखत मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली. मात्र राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पारुपल्ली कश्यपसह बी.साईप्रणीथला पराभवाला सामोरे जावे लागले. 

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची दोन कांस्यपदके नावावर असणाऱ्या सिंधूने पाचव्या मानांकित थायलंडच्या पॉर्नटिप ब्युरानप्रार्स्टुकवर २३-२१, २१-९ अशी मात केली. ३७ मिनिटांच्या लढतीत, पहिल्या गेममध्ये मुकाबला अनेकदा बरोबरीत होता, मात्र शेवटच्या क्षणांमध्ये अचूक खेळ करत सिंधूने बाजी मारली. दुसऱ्या गेममध्ये तडाखेबंद स्मॅशेस, कलात्मक क्रॉसकोर्ट आणि नेटजवळून सुरेख खेळ करत सिंधूने सामन्यावर कब्जा केला.

अजय जयरामने पहिल्या लढतीत भारताच्याच आदित्य प्रकाशवर २१-६, १७-२१, २१-१४ असा विजय मिळवला. पहिला गेम सहजतेने नावावर केल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये आदित्यने सरशी साधली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये अजयने लौकिकाला साजेसा खेळ करत आगेकूच केली.
दुसऱ्या लढतीत अजयने मलेशियाच्या डॅरेन लिअूला २१-१६, २१-२३, २१-८ असे नमवले. अटीतटीच्या मुकाबल्यात अजयने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये शेवटच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे लिअूने बाजी मारली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये मात्र अजयने स्मॅशेसच्या प्रभावी फटक्यांसह सामना जिंकत उपांत्य फेरी गाठली.
सिंगापूरच्या झि लिआंग डेरेक वाँगने कश्यपचे आव्हान १३-२१, २१-१७, २१-१३ असे संपुष्टात आणले. राष्ट्रकुल सुवर्णपदकानंतर कश्यपच्या कामगिरीतील घसरण कायम राहिली. कोरियाच्या ली ह्य़ुानने बी.साईप्रणीथवर २१-१५, २१-१७ असा विजय मिळवला.

23सानिया मिर्झाला हंगामातले पहिले जेतेपद
सिडनी : गेल्या वर्षी जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या सानिया मिर्झाने नव्या वर्षांची सुरुवात जेतेपदाने केली आहे. तैपेईच्या नियमित सहकारीऐवजी अमेरिकेच्या बेथानी मॅटेक सँड्सच्या साथीने खेळताना नव्या हंगामातील पहिले तर कारकीर्दीतील २३व्या जेतेपदाची कमाई केली. सानिया-मॅटेक जोडीने अमेरिकेच्या अबिगेइल स्पीअर्स आणि राक्वेल कोप्स-जोन्स जोडीवर ६-३, ६-३ असा विजय मिळवला. या जोडीचे हे एकत्रित पाचवे जेतेपद आहे. सानिया-मॅटेक जोडीने सात ब्रेकपॉइंट्स वाचवले. याआधी सानियाला या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंतच मजल मारता आली होती. या जेतेपदासह सानिया-मॅटेक जोडीने क्रमवारीच्या ४७० गुणांची कमाई केली आहे.

Story img Loader