भारताची उदयोन्मुख खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुन्हा पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे. तिने दहाव्या स्थानावर झेप घेतली असून ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिने आपले चौथे स्थान कायम राखले आहे.
सिंधू ही मागील आठवडय़ात बाराव्या स्थानावर होती. जपान खुल्या स्पर्धेत तिला दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी तिने दहावे स्थान मिळविले आहे. पुरुष गटात पारुपल्ली कश्यप व आरएमव्ही गुरुसाईदत्त यांना अनुक्रमे १४वे व २४वे स्थान मिळाले आहे. अजय जयराम याने २६वे स्थान घेतले आहे. किदम्बी श्रीकांत व एच. एस. प्रणय यांनी अनुक्रमे ३२वे व ४२वे स्थान मिळविले आहे. आनंद पवारला ३४वे तर सौरभ वर्मा याला ४३वे स्थान मिळाले आहे.

Story img Loader