भारताची युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिचे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. जर्मनीच्या ज्युलियन श्चेंक हिने सिंधूला दुसऱ्या फेरीत २१-१७, २१-१४ असे पराभूत करत आगेकूच केली. ज्वाला गट्टा आणि व्ही. दिजू या भारताच्या मिश्र दुहेरी जोडीला दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का सहन करावा लागला.
दुसऱ्या फेरीत सिंधूसमोर आव्हान होते ते चौथ्या मानांकित ज्युलियन श्चेंकचे. पण याआधी दिग्गज प्रतिस्पध्र्याना धूळ चारणाऱ्या सिंधूकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पहिल्या गेममध्ये ५-१ अशी आघाडी घेत सिंधूने शानदार सुरुवात केली. पण ज्युलियनने सुरेख खेळ करत ६-६ अशी बरोबरी साधली. ज्युलियनपेक्षा सिंधूचा खेळ काकणभर सरस होत होता. त्यामुळे १७व्या गुणापर्यंत सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूला पुढे जाण्याची संधी दिली नाही. पण १७-१७ अशा बरोबरीनंतर ज्युलियनने आपला अनुभव पणाला लावत चार गुणांची कमाई करून पहिला गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्येही सिंधूने ३-० अशी आघाडी घेतली. पण ज्युलियनने तिला १३-९ असे पिछाडीवर टाकले. १२-१६ अशा स्थितीतून ज्युलियनने मागे वळून पाहिले नाही. दुसऱ्या गेमसह ज्युलियनने सामन्यावर वर्चस्व गाजवले.ज्वाला गट्टा आणि व्ही. दिजू जोडीला पोलंडच्या आठव्या मानांकित रॉबर्ट मॅटेसियाक आणि सातोको सुएत्सुना जोडीने २१-१७, २१-१६ असे पराभूत केले. या सामन्यात ज्वाला-दिजू जोडीकडून अपेक्षित कामगिरी होऊ शकली नाही.

Story img Loader