युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि आरएमव्ही गुरुसाईदत्त यांनी वंकिना अंजानी देवी स्मृती अखिल भारतीय वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले. जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानी असलेल्या सिंधूने अरुंधती पानतावणेवर २१-१३, २१-१९ अशी सरळ गेममध्ये मात केली.
पहिल्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला आणि गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये अरुंधतीने काही गुण मिळवले; परंतु सिंधूने त्यानंतर सरशी साधत दुसऱ्या गेमसह सामना जिंकला. पुरुषांमध्ये गुरुसाईदत्तने बी. साईप्रणीथला २१-१९, २१-१४ असे नमवले. परतीच्या फटक्यांवर अचूक नियंत्रण आणि स्मॅशच्या फटक्यांचा प्रभावी वापर करीत गुरुसाईदत्तने हा सामना जिंकला. पहिल्या गेममध्ये गुरुसाईदत्त १३-१५ असा पिछाडीवर होता. मात्र त्यानंतर सलग गुणांची कमाई करीत त्याने आगेकूच केली आणि गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये साईप्रणीथच्या खेळात संथपणा आल्याचा गुरुसाईदत्तने फायदा उठवीत दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
पुरुष दुहेरीत अक्षय देवलकर आणि प्रणव चोप्रा जोडीने तरुण कोना आणि अरुण विष्णू जोडीवर १६-२१, २१-९, २१-१५ अशी मात केली. महिला दुहेरीत प्रज्ञा गद्रे-जी. रुथविका शिवानी जोडीने जे. मेघना आणि रितुपर्णा दास जोडीला १८-२१, २१-१७, २१-१८ असे नमवले.
मिश्र दुहेरीत अक्षय देवलकर आणि प्रज्ञा गद्रे जोडीने अरुण विष्णू-अपर्णा बालन जोडीवर १७-२१, २१-१०, २१-१८ असा विजय मिळवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा