भारताची युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने ‘स्विस’ अभियानाची दणक्यात सुरुवात केली. बेसेल येथे सुरू असलेल्या स्विस ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने मलेशियाच्या सान्नातासाह सानिरू हिचा सहज पराभव करत विजयी सलामी नोंदवली. भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप आणि आनंद पवार यांनीही दुसऱ्या फेरीत मजल मारली आहे.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या सिंधूने सानिरू हिच्यावर ३२ मिनिटांत २१-१८, २१-१५ अशी सहज मात करत दुसरी फेरी गाठली. सिंधूने सलग तीन गुण मिळवत ३-० अशी आघाडी घेतली. तिने ती पुढे १०-३ अशी वाढवली. मात्र सानिरू हिने सुरेख खेळाचे प्रदर्शन करत १५-१६ अशी आगेकूच केली. मात्र पुन्हा एकदा चमकदार खेळ करत सलग तीन गुणांची कमाई करत सिंधूने पहिला गेम आपल्या नावावर केला. दुसरा गेम अटीतटीचा झाला. ७-७ अशा बरोबरीनंतर १४-१४ अशी उत्कंठावर्धक लढत सुरू होती. मात्र सिंधूने आपला अनुभव पणाला लावत २१-१५ असा गेम जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या सिंधूला आता कॅनडाची लि मिचेल आणि रशियाची इला दिहल यांच्यातील विजेतीश लढत द्यावी लागेल.
राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या कश्यपने नेदरलॅण्ड्सच्या इरिक मेयजस याचे आव्हान २१-१७, २१-१५ असे सहज मोडीत काढले. तिसऱ्या मानांकित कश्यपला आता पुढील फेरीत जर्मनीच्या लुकास शिमिड याचा सामना करावा लागेल.
जागतिक क्रमवारीत १८व्या स्थानावर असलेल्या कश्यपने सुरुवातीलाच ६-३ अशी आघाडी घेतली होती. मात्र नंतर चुकांची पुनरावृत्ती होऊ लागल्यामुळे तो ९-११ असा पिछाडीवर पडला. पण आपला खेळ उंचावत त्याने मागे वळून न पाहता पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही त्याने ५-४ अशा स्थितीतून सलग सहा गुण मिळवत १०-४ अशी आघाडी घेतली. प्रतिस्पध्र्याला डोके वर काढण्याची कोणतीही संधी न देता त्याने दुसरा गेम जिंकून आगेकूच केली. आनंदला सलामीच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी फारसे प्रयास पडले नाहीत. मलेशियाच्या कोक पोंग लोक याचा २१-१७, २१-१० असा २६ मिनिटांत धुव्वा उडवत आनंदने दुसरी फेरी गाठली. त्याला जर्मनीच्या टोबियास वाडेन्का याच्याशी झुंज द्यावी लागेल.
दरम्यान, तरुण कोना आणि अश्विनी पोनप्पा या भारताच्या मिश्र दुहेरी जोडीला पोलंडच्या रॉबर्ट मॅटेवसियाक आणि अग्निस्झेका वोजकोव्हस्का यांच्याकडून १०-२१, २१-१६, १३-२१ अशी हार पत्करावी लागली. चीनच्या शिझियान वँगने ठाण्याच्या सायली राणे हिच्यावर २१-८,२१-९ अशी सहज मात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा