पी. गोपीचंद यांच्याऐवजी विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या सायना नेहवालसह युवा पी. व्ही. सिंधू, पारुपल्ली कश्यप यांनी डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
सातव्या मानांकित सायनाने जपानच्या मिनात्सू मितानीवर २१-१२, २१-१० असा दणदणीत विजय मिळवला. सूर गवसलेल्या सायनाने तडाखेबंद स्मॅशेस, क्रॉसकोर्टचे फटके आणि नेटजवळून शिताफीने खेळ करत मितानीचे आव्हान संपुष्टात आणले.
सिंधूने रशियाच्या सेनिआ पोलिकरपोव्हावर २१-१७, २१-१९ असा विजय मिळवला. सिंधूने ४-२ अशी आघाडी घेतली. तिने ही आघाडी १४-१० अशी वाढवली. सलग चार गुणांची कमाई करत सिंधूने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मुकाबला २-२ आणि त्यानंतर ७-७ असा बरोबरीत होता. मात्र सिंधूने जोरदार स्मॅशेस आणि प्रदीर्घ रॅलींवर भर देत वर्चस्व गाजवले. शेवटच्या क्षणांमध्ये खेळ उंचावत सिंधूने दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
किदम्बी श्रीकांतने तैपेईच्या जेन हाओ स्युला २१-१५, २१-१२ असे नमवले. पी. कश्यपला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला.कश्यपने इंडोनेशियाच्या डिओन्युसियस हायओम रुमबाकावर २१-१७, १७-२१, २२-२० अशी मात केली.

Story img Loader