दोन वेळा कांस्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पध्रेत अनुक्रमे महिला व पुरुष एकेरी गटात विजयासह आगेकूच केली आहे. २०१३ आणि २०१४साली जागतिक स्पध्रेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या ११व्या मानांकित सिंधूने पहिल्याच लढतीत डेनमार्कच्या लीन किजार्सफेल्ड्टवर ५० मिनिटांत ११-२१, २१-१७, २१-१६ असा अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत १३व्या स्थानावर असलेल्या सिंधूने बराच काळ दुखापतीमुळे कोर्ट बाहेर घालवला होता. पहिल्या फेरीत पुढे चाल मिळालेल्या सिंधूला उपउपांत्यपूर्व फेरीत ऑलिम्पिक विजेत्या आणि माजी अव्वल खेळाडू चीनच्या ली झ्युइरुईशी सामना करावा लागणार आहे.
पहिल्या सेटमध्ये सिंधूला लीनकडून कडवी टक्कर मिळाली. लीनने ६-१ अशी आघाडी घेत सिंधूवर दडपण निर्माण केले आणि हा सेट २१-११ असा जिंकून आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने ५-२ अशी आघाडी घेत पुनरागमन केले. लीननेही अप्रतिम खेळ करताना ७-७ अशी बरोबरी आणून सामन्यात चुरस निर्माण केली, परंतु सिंधूच्या आक्रमक खेळासमोर तिला हार पत्करावी लागली आणि लढत १-१ अशी बरोबरीची झाली. निर्णायक सेटमध्ये ४-१ अशा आघाडीवर असलेल्या लीनला नेट्सजवळ खेळवून सिंधूने १३-९ अशी आघाडी घेतली. या आघाडीबरोबर सिंधूने गुणांची भर टाकत या सेटसह सामनाही जिंकला.
पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या श्रीकांतला विजयासाठी फार संघर्ष करावा लागला नाही. त्याने अवघ्या २४ मिनिटांत ऑस्ट्रेलियाच्या मियकेल फॅरीमनवर २१-१०, २१-१३ असा दमदार विजय मिळवला. भारतीय खुल्या स्पध्रेत जेतेपद पटकावणाऱ्या श्रीकांतला पुढील फेरीत चायनीच्या तैपेईच्या ह्सु जेन हाओशी सामना करावा लागणार आहे.
मिश्र दुहेरीत मुन अत्री व सुमिथ बी रेड्डी आणि महिला दुहेरीत ध्याना नायर व मोहिता सहदेव यांचे आव्हान संपुष्टात आले. अत्री व रेड्डी जोडीला चीनच्या चाय युन आणि लु काई यांनी २३ मिनिटांत २१-९, २१-७ असे पराभूत केले, तर नायर व सहदेव या जोडीला फ्रान्सच्या पुवारनुक्रोह डेचापेल व क्रेडेन किट्टीनुपाँग जोडीने २१-१५, २१-१४ असे नमवले.

Story img Loader