सायना नेहवालपाठोपाठ युवा पी. व्ही. सिंधूनेही डेन्मार्क सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी नोंदवली. मात्र पारुपल्ली कश्यप, किदम्बी श्रीकांत, एच. एच. प्रणॉय यांच्यासह मनू अत्री आणि सुमित रेड्डी जोडीला पराभवाला सामोरे जावे लागले.

सलामीच्या लढतीत सिंधूने इंडोनेशियाच्या मारिया फेबे कुसुमास्तुतीवर २१-१३, २१-११ असा विजय मिळवला. दुखापतीनंतर पुनरागमन केल्यानंतर सिंधूला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
दुसऱ्या फेरीच्या लढतीत इंडोनेशियाच्या टॉमी सुगर्तोने किदम्बी श्रीकांतला २१-१५, २१-१७ असे नमवले. सलामीच्या लढतीत मलेशियाच्या ली चोंग वेईने पारुपल्ली कश्यपवर २१-१४, २१-१५ असा सहज विजय मिळवला. तैपेईच्या ह्य़ुस्यू जेन हाओने प्रणॉयवर २३-२१, १९-२१, २१-१५ अशी मात केली. पहिल्या गेममध्ये प्रणॉयने शानदार खेळ करत जेनवर सरशी साधली. मात्र त्यानंतर प्रणॉयच्या खेळातला अचूकता हरपली.
अटीतटीच्या लढतीत तैपेईच्या ली शेंग म्यू आणि साइ चिआ सिन जोडीने मनू अत्री-सुमित रेड्डी जोडीचा २१-१९, २०-२२, २१-१९ असा पराभव केला. पहिला गेम गमावल्यानंतर मनू-सुमित जोडीने झंझावाती खेळासह दुसरा गेम जिंकला. तिसऱ्या गेममध्ये प्रत्येक गुणासाठी जोरदार मुकाबला रंगला. मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत तैपेईच्या जोडीने बाजी मारली.

Story img Loader