नवी दिल्ली : भारताची दोन ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू पी. व्ही. सिंधूने डाव्या पायाच्या दुखापतीमुळे आगामी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. सिंधूने शनिवारी ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली.
सिंधूने २०१९मध्ये जागतिक स्पर्धा जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली होती. तसेच तिने या स्पर्धेत दोन वेळा रौप्यपदक, तर दोन वेळा कांस्यपदकही पटकावले आहे. बर्मिगहॅम येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सिंधूने सुवर्णपदक पटकावले होते.
‘‘राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकामुळे माझ्या आशा उंचावल्या होता. मात्र, दुर्दैवाने पायाच्या दुखापतीमुळे मला जागतिक स्पर्धेतून माघार घ्यावी लागते आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीपासूनच पायाला वेदना जाणवत होत्या. हैदराबादला परतल्यावर तातडीने ‘एमआरआय’ चाचणी करून घेतली. त्यात डाव्या पायाची दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाले आहे,’’ असे सिंधू म्हणाली.