अत्याधुनिक मोबाइल, आकर्षक दागिने, स्टायलिश कपडे हे सगळं मिळावं यासाठी १८ वर्षीय युवती वाढदिवसाला मनात अपेक्षा करू शकते. मात्र पुढील महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्य फेरीचे लक्ष्य, जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान आणि जागतिक सुपर सीरिज फायनल साठी पात्र होणे अशी इच्छांची अनोखी यादी युवा बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने १८व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला तयार केली आहे. सायना नेहवालसह बॅडिमटनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा रोवणारी सिंधू शुक्रवारी १८व्या वर्षांत पदार्पण करत आहे. भौतिक गोष्टींपेक्षा बॅडमिंटन सर्वस्व असणाऱ्या सिंधूने खेळासंबंधित उद्दिष्टे पूर्ण करण्याची महत्त्वांकाक्षा मनी धरली आहे.
आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पदार्पण केल्यापासून सिंधूने दोनच वर्षांत क्रमवारीत अव्वल २० खेळाडूंत स्थान मिळवले आहे. यंदा मे महिन्यात मलेशियन ग्रां.प्रि. स्पर्धेचे जेतेपद तिने नावावर केले आणि आता अव्वल दहा खेळाडूंच्या मांदियाळीत स्थान मिळवण्यापासून ती अवघ्या दोन क्रमांकांनी मागे आहे.
सध्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत असलेल्या उर्वरित वर्षांसाठी प्रशिक्षक गोपीचंद यांच्या साथीने योजना आखली आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मी पहिल्यांदाच खेळत आहे. त्यामुळे उपांत्य फेरीपर्यंत तरी मला मजल मारायची आहे असे सिंधूने सांगितले. जागतिक सुपर सीरिजसाठी पात्र होण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. हे नक्कीच खडतर आव्हान आहे मात्र मी सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेन असे तिने पुढे सांगितले.
आगामी इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये सिंधूला आयकॉन खेळाडूचा दर्जा प्राप्त झाला आहे. ५०,००० अमेरिकन डॉलर्स एवढी रक्कम बेस प्राइज म्हणून सिंधूला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा